पाणीबाणी! विहिरींवर बंदोबस्त वाढविला; हंडा हिसकावणारी गँग जेरबंद

1
प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । पुणे

‘राज्यातील पाणी असलेल्या विविध विहिरींवर पोलीस बंदोबस्त वाढविला’… ‘प्रत्येक हापशावर एक पोलीस तैनात करण्याची गृहमंत्रालयाची घोषणा’… ‘रेशनदुकानावर आता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करण्याची अन्न व औषध प्रसासनाची घोषणा’ यासह अनेक संदेशाच्या माध्यमातून सोशल मीडियावर सध्या पडलेल्या दुष्काळाची दाहकता दर्शविण्याचा प्रयत्न नेटकरी करत असून, ‘पाणी जपून’ वापण्याबाबत जनजागृती करत आहेत.

गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागामध्ये पाण्याअभावी विदारक चित्र पाहायला मिळत आहे. तर शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे कोरडी पडू लागली आहेत. दरम्यान, नेटकरी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक चांगल्या-वाईट घटनेवर भाष्य करत असतात. त्याचप्रमाणे सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत संदेशाच्या माध्यमातून सोशल मीडियावर अनेक नेटकरी प्रबोधन करताना दिसत आहेत.

‘गोदामावर छापा टाकून साठवून ठेवलेले पाच हजार लिटर पाणी केले जप्त’, ‘पाण्याअभावी दोघांचा दुर्दैवी अंत, समाजमन हेलावले’, ‘पाण्याचा हंडा हिसकावणारी बाईक गँग पोलिसांच्या जाळ्यात’, ‘रुग्णासाठी खास पाण्याच्या सलाईन उपलब्ध करू’, ही परिस्थिती भविष्यामध्ये नक्की निर्माण होईल. त्यामुळे आताच सावध होऊन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’, असे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. ‘एक महिला भोंदूबाबाला म्हणते, बाबा जसे तुम्ही हवेतून अंगठ्या, चेन काढता, एक हंडाभर पाणी काढा बरं’ असे संदेश देणारे छायाचित्रदेखील सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, मटक्यामध्ये दगडाचे खडे टाकून पाणी वर आल्यानंतर पाणी पिणाऱ्या कावळ्याची कथेतील प्रसंगाचा आधार घेऊन दुष्काळाचे विदारक चित्र मांडणारे छायाचित्र सोशल मीडियावरमन हेलावून टाकत आहे. मटके दगडाने भरते. मात्र, पाणी बाहेर येत नाही त्यामुळे कावळ्याचा अंत होतो. हे छायाचित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.