संतप्त शेतकऱ्यांपुढे केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नरमले

सुरेश जंपनगिरे । परभणी

परभणी जिल्ह्यातील गंभीर दुष्काळ असलेल्या परभणी, मानवत आणि सेलू या तीन तालुक्यातील गावांची पाहणी करण्यासाठी परभणी जिल्ह्यात दुष्काळी पाहणी पथकाकडे नजरा लागलेल्या असताना ऐनवेळी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दौरा या पथकाने रद्द करताच संतप्त शेतकऱ्यांनी या पथकाच्या गाड्या अडवून हा दौरा करण्यास भाग पाडले. अखेर दुष्काळ पाहणी पथकाने नरमाईची भूमिका बजावत पेडगावची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

केंद्रीय दुष्कळी पथकाच्या दौऱ्यातून परभणी तालुक्यातील पेडगाव हे रद्द करण्यात आले असल्याचे सोशल मीडियावरुन समजताच मानवत तालुक्यातील रुढी फाट्यावर या पथकातील अधिकाऱ्यांच्या गाड्या शेतकऱ्यांनी अक्षरश: अडविल्या. तेव्हा अधिकारी नरमल्याने या पथकाने पेडगावत जाऊन जी ओसाड परिस्थिती निर्माण झाली आहे, तिची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांनी या पथकास दुष्काळाच्या झळा बाबतच्या व्यथा मांडल्या. यंदाची रबीची पेरणी सुद्धा झाली नाही. दिवसेंदिवस पाणीपातळी खोल-खोल जात आहे. जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच गव्हाची पेरणी बहुतांश भागात झालीच नसल्याचे यावेळी पथकास माहिती देण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे खरा पण अद्यापर्यंत कोणतीही मदत मिळालीच नसल्याचे सांगितले.

जिल्हयातील शेतकऱ्यांशी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने परभणी जिल्ह्याातील सेलू तालुक्यातील गणेशपुर, परभणी तालुक्यातील पेडगाव व मानवत तालुक्यातील रुढी गावांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान त्यांनी शेतीतील नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. मराठवाड्यातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा पूर्ण होताच पाहणी दौऱ्याचा अहवाल केंद्राकडे सुपूर्द केला जाणार आहे. इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) अंतर्गत येणाऱ्या पथकाचे प्रमुख केंद्रीय नीती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस.सी. शर्मा, आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवरसचिव एस.एन. मेहरा यांचा समावेश होता. या पथकासमवेत विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, अप्पर आयुक्त विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, कृषी विभागाचे सहसंचालक जगताप तसेच महसुल व इतर विभागाचे अधिकारी यांचीही उपस्थिती होती. या पथकाने गणेशपूर शिवारातील त्रिवेणी रामचंद्र गीते यांच्या शेताला प्रथम भेट देऊन तेथील पिक नुकसानीची पाहणी केली. गीते दांपत्याशी व शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन पिक उत्पादन व उत्पन्न याविषयी माहिती घेतली. त्यानंतर पथकाने पेडगाव येथील गणेशराव हरकळ यांच्या शेतातील पाणीपातळी खुप खालावलेल्या विहिरीची पाहणी केली. तसेच शेजारच्या हरकळ कुटुंबीयांच्या शेतीमधील नुकसानीचीही पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. रूढी गावातील शेतात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. यावेळी आमदार मोहन फड यांनीही दुष्काळ परिस्थिती विषयी पथकाला माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी जिल्ह्यातील एकंदरीत पाणीटंचाई, पिकांची अवस्था यासोबतच धरणातील पाणीसाठ्याबाबत पथकाला माहिती दिली. पथकप्रमुख चौधरी यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास करुन केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. या पथकाने परभणीनंतर बीड जिल्ह्यातील पाहणीसाठी प्रयाण केले.

सेलू तालुक्यातील गणेशपूर परिसरात आज सकाळी दुष्काळी पाहणी पथकाने दौरा केला. यानंतर पथक रूढी या गावाच्या पाहणीसाठी निघाले होते. मानवत रोडवरील रेल्वे फाटक सचखंड एक्सप्रेस आल्याने बंद होते. पेडगावचा दौरा रद्द झाल्याची माहिती सकाळीच प्रशासनाने शेतकऱ्यांना दिली होती. यामुळे येथील शेतकरी मानवत रोडवरील फाटकावर पथकाची वाट पाहत होते. पथक प्रमुख, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदींच्या गाड्या येथे येताच शेतकऱ्यांनी गाड्यासमोर आडवे होत पथकाला अडवले.

मानवत तालुक्यातील पेडगाव गावाचा दुष्काळी पाहणी दौरा प्रशासनाने प्रारंभी सकाळी अचानक रद्द केला होता. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळी पाहणी पथकाचा ताफा 11.30 वाजेच्या दरम्यान मानवतरोडवर अडवला. संतप्त शेतकऱ्यांनी ‘आमच्या वेदना समजून घ्या, आम्हाला काही दिल नाही तरी चालेल पण दौरा करा,’ अशी विनंती केली. तसेच हा दौरा रद्द का केला याचा जाबही विचारला आणि दौऱ्यावर येणार नसाल तर गाड्यासमोर झोपू असा इशाराही दिला. यानंतर पथक माघारी फिरत पेडगावच्या दिशेने रवाना झाले. या दरम्यान, दुष्काळी उपाययोजना बाबत झालेल्या चर्चेत महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची उत्तरे देताना भंबेरी उडाली. मनरेगाची कामे उपलब्ध करून देण्याबरोबरच ‘जॉब कार्ड’ही पुरेसे दिले नसल्याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शेत जमिनीचे ‘हेल्थ कार्ड’ ही शेतकयांना दिले नसल्याचेही यावेळी समोर आले. स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये यावेळी माहितीबाबत समन्वय आढळून आला नाही. पथकातील अधिकाऱ्यांनी मात्र यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने कामे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.