40 वर्षांपासून येवलेकर अनुभवताहेत दुष्काळाची तीव्रता, टँकरची संख्या शंभरीकडे

सामना प्रतिनिधी, येवला

दुष्काळाची तीव्रता काय असते हे येवलेकर गेल्या 40 वर्षांपासून अनुभवत आहे. मात्र मागील दोन वर्षे तर या दुष्काळाने येथील नागरिकांचा जणू अंतच पाहिला आहे. कारण मागील वर्षी मार्च महिन्यात सुरू झालेला टँकरपुरवठा आता एप्रिल महिना झाला तरी सुरू आहे म्हणजे तब्बल 13 महिन्यांपासून येवलेकर टँकरवरच आपली तहान भागवत असून अजून दोन-तीन महिने या टँकरवरच येवलेकरांना अवलंबून राहावे लागणार आहे. गावांना पाणीटंचाई निर्माण होऊन टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत येते. खूपच भयानक टंचाई असेल तर जानेवारीपासून टँकर सुरू करण्याची वेळ येते. मात्र तालुक्यात तब्बल वर्ष उलटले तरीही सलग टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

मागील वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या टँकरच्या पाणीपुरवठय़ाचा खर्च दोन कोटींपर्यंत पोहोचला असून हा सर्व खर्च पाण्यात गेला आहे. राज्यातील ज्या 94 तालुक्यांची दुष्काळी अशी नोंद आहे. त्यात येवल्याचे नाव अग्रस्थानी असून प्रत्येक उन्हाळा येथील जनतेला असह्य करणारा आहे. उन्हाळ्यातील तीन ते चार महिने येथील 50 वर गावे व वस्त्यांना टँकर सुरू केल्याशिवाय पर्यायच नसतो. समाधानाची बाब म्हणजे 38 गावे नळ पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाऊन आजमितीस 55 गावे टँकरमुक्त झाली आहेत. अशीच अजून एका मोठय़ा योजनेची तालुक्याला गरज आहे तरच येथील टँकरग्रस्त हा शाप पुसला जाणार आहे. नाहीतर ब्रिटिशकालीन टँकरग्रस्त तालुका अजून किती वर्षे हा शाप घेऊन जगेल याचे उत्तर भविष्यकाळाच देईल.

गेल्या वर्षी म्हणजे 2017-18 मध्ये पावसाळ्यात महसूलच्या मंडळस्तरावरील पर्जन्यमापकात झालेल्या नोंदीतून तालुक्यातील आकडेवारी फुगली खरी, मात्र तालुक्यातील सर्वदूरच्या पावसाचा असमतोलपणा अन् त्यातून पुढे गावोगाव झपाटय़ाने खालावत गेलेली पाणी पातळी यामुळे उन्हाळ्यात तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीटंचाईची धग बसली. विशेषतः पाटपाण्याचा कायमस्वरूपी असा कुठलाच स्रोत नसलेल्या तालुक्यातील उत्तरपूर्व भागाला या तीव्र पाणीटंचाईच्या अधिक झळा सहन करावी लागली. मागील वर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती व प्रशासनाकडे आले होते. मात्र जलयुक्तचे अपयश झाकण्यासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक उशिराने मंजुरी दिल्याने टँकरचा ‘श्रीगणेशा’ 12 मार्चपासून झाला. त्यानंतर पुढे दिवसागणिक तहानलेल्या गावांची संख्या वाढतच गेली.

तालुक्यातील आहेरवाडी, कुसमाडी, खैरगव्हाण, चांदगाव, कासारखेडे, बाळापूर, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, वाईबोथी, ममदापूर, खिर्डीसाठे, लहीत, गुजरखेडे व खैरगव्हाण, राजापूर अशी काही गावे यात आहेत. मेनंतर नव्याने गावांची संख्या वाढली नाही, पण पावसाळा कोरडा गेला अन् पुन्हा ऑक्टोबरपासून टँकरची मागणी सुरू झाली ती आजतागायत वाढतच आहे. याचमुळे आजमितीस 34 टँकरद्वारे 88 गावे व वाडय़ांना रोज 87 खेपाद्वारे सुमारे दोन लाख नागरिकांसाठी रोज सुमारे बारा लाख लिटर पाणी पुरवण्याची वेळ येत आहे.

12 मार्च 2018 ते आजतागायत…
खैरगव्हाण व कुसमाडी येथे टँकर 3 ला मंजुरी देत 12 मार्चला टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. गेल्या वर्षी मार्चमध्ये 4, एप्रिलमध्ये 13 तर मे मध्ये 24 गावांना मागील उन्हाळ्यात टँकर सुरू करण्यात आले. ते आजही सरूच असून या गावात पावसाळय़ाचे फक्त महिने संपले, पण पाऊस मात्र रिमझिमच पडल्याने जलस्रोत कोरडेच राहिले अन् तहान भागवण्यासाठी टँकर सुरूच ठेवावे लागले ते मध्ये चार-दोन दिवसांचे तांत्रिक अपवाद वगळता अजूनही सुरूच आहे.

मागील 40-45 वर्षांपासून या तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यावर कितीतरी कोटी खर्च झाले. मागील तीन वर्षांतच 3 ते 4 कोटी चुराडा झाला आहे. एवढय़ा पैशात कायमचा पर्याय शोधून गावे टँकरमुक्त करता आली असती. अजूनही धडा घेऊन नियोजित पाणी योजना कार्यान्वित केल्या तरी तालुक्याचे चित्र बदलेल.
– ऍड.मंगेश भगत, सदस्य, पंचायत समिती, येवला

आपली प्रतिक्रिया द्या