केरळात दुष्काळाचे संकट

सामना ऑनलाईन । थिरुवनंतपुरम

केरळवर ओढवलेल्या महापुराच्या भीषण आपत्तीनंतर आता राज्यावर नवे वेगळेच संकट ओढवले आहे. राज्यातील नद्या आणि विहिरींचे पाणी आटल्याने आता केरळवासीयांवर कोरड्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. केरळ सरकारने या समस्येचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांची समिती नेमली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी राज्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण परिषदेला केरळवर ओढवलेल्या नव्या संकटावर मार्ग काढण्यासाठी संशोधन करण्याचे आदेश दिले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या वायनाड जिह्यातील शेतजमीन नद्या आणि विहिरींचे पाणी आटल्याने नापिकीच्या मार्गावर आली आहे. राज्यातील पेरियार, भारतपुझा, पम्पा आणि कबानी नद्यांची पात्रे आश्चर्यकारकरीत्या आटली आहेत. अनेक जिह्यांतील विहिरीतील पाणीही गायब झाल्याने केरळवासीय नव्या संकटात सापडले आहेत.