लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न भीषण, 40 प्रकल्प कोरडे पडले

2

सामना प्रतिनिधी, लातूर

जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर संकट धारण केलेला आहे. शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाईने तिव्र स्वरुप धारण केले आहे. जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पात केवळ 1.88 टक्के पाणीसाठा आहे तर 155 तलावात 0.44 टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील 40 प्रकल्प कोरडे पडलेले आहेत तर 81 तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. पशुपालकांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात विकत पाणी घेण्याची वेळ नागरीकांवर आलेली आहे.

लातूर जिल्ह्यातील नागरीक पुन्हा यावर्षी पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. मुळातच लातूर जिल्ह्यात एकही मोठे धरण नाही. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना, औद्योगीक वसाहतींना पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्प धनेगाव जि. बीड, आणि निम्न तेरणा प्रकल्प लोहारा जि. धाराशिव या दोन्ही ठिकाणी सध्या उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. लातूर जिल्ह्यात 8 मध्यम प्रकल्प आहेत. या ठिकाणी केवळ 1.88 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प कोरडा पडलेला आहे. रेणापूर तालुक्यातील व्हटी आणि रेणापूर मध्यम प्रकल्पात जोत्याखाली पाणीसाठा आहे. उदगीर तालुक्यातील देवर्जन येथे 2.96 टक्के पाणीसाठा आहेत तर तिरु प्रकल्पात जोत्याखाली पाणीसाठा आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे 5.86 टक्के तर घरणी प्रकल्पात 5.96 टक्के पाणीसाठा आहे. निलंगा तालूक्यातील मसलगा येथे जोत्याखाली पाणीसाठा आहे.

लातूर जिल्ह्यात 128 लघू तलावांची संख्या असून त्यामध्ये केवळ 0.62 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. लातूर तालुक्यातील 5 तलावात शुन्य टक्के पाणी आहे. औसा तालुक्यातील 14 तलावात शुन्य टक्के पाणी आहे. उदगीर तालुक्यातील 10 तलावात शुन्य टक्के पाणी आहे. निलंगा तालुक्यातील 11 तलावात 1.16 टक्के पाणी आहे. अहमदपूर तालुक्यातील 17 तलावामध्ये शुन्य टक्के पाणी आहे. रेणापूर तालुक्यातील 6 तलावामध्ये 0.33 टक्के पाणी आहे. चाकूर तालुक्यातील 20 तलावामध्ये 0.67 टक्के पाणी आहे. देवणी तालुक्यातील 11 तलावामध्ये 1.66 टक्के पाणी आहे. जळकोट तालुक्यातील 10 तलावामध्ये 0.08 एवढेच पाणी आहे. तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील एका तलावात 8.5 टक्के पाणी शिल्लक राहिलेले आहे.

एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे. दुसरीकडे पाण्याची टंचाई तीव्र स्वरुप धारण करीत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात पिण्यासाठी विकतचे पाणी वापरले जात आहे. चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही अशी अवस्था पशुपालकांची झालेली आहे. त्यामुळे कवडीमोल भावाने जनावरे विकली जात आहेत.