दुष्काळाचे सावट पोळा सणावर

पोळा सणासाठी राहाता शहराची बाजारपेठ अशी सजली पण दुष्कळाच्या सावटाने बाजारात ग्राहकच नाही (छाया : अशोक सदाफळ)

सामना प्रतिनिधी । राहाता

पोळा सणासाठी बाजार पेठा सजल्या मात्र ग्राहकच नसल्याने व्यापारी चितातूर झाले आहेत. पावसाअभावी दुष्काळाचे सावट या सणावर दिसून येत आहे.

एक दिवसावर पोळ्याचा सण आला असताना व सणासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ फुलून गेली मात्र ग्राहकच नसल्याने छोटे मोठे व्यापारी चिंतेने ग्रासले आहेत. पोळ्यासाठी प्रत्येक शेतकरी बैल व आपल्या दारात बांधलेल्या जनावरासाठी या सणाला खरेदी करतोच. त्यामुळे तालुक्याची बाजारपेठ दरवर्षी सजते. लाखो रूपयांची उलाढाल चार दिवसात होत असते. मात्र यावर्षी चित्र वेगळे असून या परीसरात पावसाने दडी मारल्याने अनेक भागात पेरण्या नाहीत. जी पिके उभी आहे ती पावसाअभावी सुकू लागली आहेत. दुध धंदाही मोडकळीस आला आहे. पेरू बागांनीही यावर्षी दगा दिल्याने व उत्पन्नाचे स्त्रोतच नसल्याने शेतकरी कंगाल झाला आहे. खिशात पैसाच नसल्याने इच्छा असतानाही शेतकरी काहीच खरेदी करू शकत नाही, अशी स्थिती सर्वत्र निर्माण झाल्याने याचा मोठा परीणाम पोळाच्या सणाच्या बाजारपेठेवर पडला आहे.

रंगीबेरंगी साज वेगवेगळ्या कलाकुसरींचा
मोहरकी, माठवट, दोरी झुली, घोगरमाळा, देशी विदेशी साहीत्याची मोठी रेलचेल त्याचबरोबर स्थानीक कारागीरांनी तयार केलेला साज, रंग, बेडे याची दुकाने पाहून मन हरकून जाते. बोटावर मोजणारे शेतकरी साहीत्य खरेदी करताना दिसून येतात.

मातीच्या बैलांनाही मागणी घटली
पुजेसाठी लागणारे मातीचे बैलाच्या स्टॉलची मोठी गर्दी दिसून येते. पाच रूपयांच्या बैलापासून एक हजार रूपयांपर्यंतचे बैल बाजारात विक्रीसाठी आले आहेत. कलाकारांनी अद्यावत व आकर्षक सजावट करून तयारच केलेल्या बैलांना घेण्याचा मोह प्रत्येकाला पडतो मात्र सधन व धनिकांचीच पाऊले तिकडे वळताना दिसून येत आहेत.