दुष्काळाचे सावट; महाराष्ट्रात 5 हजार 664 वाड्यावस्त्यांत पाणीबाणी, 3 हजारांहून जास्त टँकर्स

राज्यात एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे, दुसरीकडे धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने खालावत चालल्याने राज्यातल्या तब्बल साडेपाच हजारांहून अधिक वाडय़ावस्त्यांतील लोकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. सध्याच्या घडीला सुमारे तीन हजार टँकर वाडय़ावस्त्यांवर धावत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत तब्बल 28 पटींनी वाढ झाली आहे. पण निवडणुकीच्या राजकारणात मशगूल असलेल्या सत्ताधाऱयांना पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱयांना बसणार आहे.

संपूर्ण राज्य उष्णतेच्या झळांमुळे होरपळून निघाले आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱया आठवडय़ातच संपूर्ण राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा 33.38 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरून राज्यात आगडोंब उसळण्याची चिन्हे आहेत. कारण सध्याच्या घडीला राज्यातल्या 1 हजार 666 गावे आणि तब्बल 3 हजार 999 वाडय़ांची तहान 2 हजार 93 टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे.

गेल्या वर्षी 12 एप्रिल रोजी राज्यातल्या फक्त 70 गावांना, 204 वाडय़ांना पाणीपुरवठा करण्यासाठी फक्त 75 टँकर धावत होते. पण सत्ताधाऱयांनी पाण्याच्या प्रश्नाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे एका वर्षात टँकरची संख्या सुमारे 28 पटीने वाढल्याचे मंत्रालयातील अधिकाऱयांनी मान्य केले.

उन्हाळ्यात अवकाळीचा फटका

राज्यात पुढील काही दिवसांत उन्हाचा तडाखा आणखीन वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मात्र दुसरीकडे विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावासाने शेतीला मोठा तडाखा दिला आहे. विदर्भात 35 हजार हेक्टरवरील शेतीचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. राज्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर दोन आठवडय़ांपूर्वी राज्य सरकारने बैठक बोलावली होती. पण त्यातून दिलासा देणारा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. जमिनीतून पाण्याचा उपसा वाढल्याने भूजल पातळी झपाटय़ाने खालावत चालली आहे. मे महिन्यात तर राज्यात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होण्याची भीती जलसंपदा विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.

टँकरची संख्या

ठाणे-32, रायगड-19, रत्नागिरी-3, पालघर-30, नाशिक-238, जळगाव-78, नगर 158, पुणे-116, सातारा-160, सांगली-84, सोलापूर-63, छत्रपती संभाजीनगर-443, जालना-343, बीड-199, धाराशीव-66, बुलढाणा-35

राज्यातल्या धरणांत 33.38 टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा

मध्य वैतरणा – 10. 61 टक्के

भातसा – 41.10 टक्के

मोडक सागर – 45.31 टक्के

तानसा – 50.03 टक्के

पंतप्रधानांचे आदेश, पण राज्य सरकार थंड

हवामान खात्याने महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्याचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी तातडीची बैठक बोलावली होती. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र, राज्य व जिल्हास्तरावरील संस्थांनी एकत्रित काम करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर राज्य सरकार थंडच आहे.