ठाण्यातील तरुणाईवर नशेचा ‘पेपर बॉम्ब’

12

सामना ऑनलाईन । ठाणे

अफू, चरस, गांजा, एमडी अशा ‘लोकल’ ड्रग्जवर कारवाई करणाऱ्या अमली पदार्थविरोधी पथकाने ठाण्यातील ड्रग्ज पेडलरकडून ‘पेपर बॉम्ब’ अर्थात एलएसडी पेपर हे खतरनाक डिझायनर ड्रग्ज पकडल्याने एकच खळबळ उडाली. उच्चभ्रूंच्या पाटर्य़ांमध्ये ‘कार्पोरेट’ ड्रग्ज म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या या अमलीपदार्थाचे दहा पेपर या पेडलरकडे सापडले. तब्बल एक लाख रुपये किंमत असलेले पेपर बॉम्ब या पेडलरने पुठे सप्लाय करण्यासाठी आणले होते, त्याने याआधी हे ड्रग्ज कोणाला दिले आहेत, याबाबत पोलीस तपास असून या नशेच्या पेपर बॉम्बचा ठाण्यातील तरुणाईवर मारा सुरू असल्याने पालकवर्ग चिंतेत आहे.

पिंक सुपर मॅन, ब्ल्यू – बॅटमॅन, ब्लॅक – स्पायडरमॅन, आय – 25 अशा विविध कोडवर्डने अमलीपदार्थांच्या बाजारात एलएसडी पेपर  सुप्रसिद्ध आहे. ठाण्यात मोठमोठी गृहसंपुले उभी राहात असताना येथे तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणारे पेडलर्स बस्तान मांडत असल्याचे याआधीही समोर आले आहे. वर्तकनगर येथील दोस्ती विहारमध्ये राहणाऱ्या हितेश मल्होत्रा (33) या अशाच ड्रग्ज पेडलरला अमली पदार्थविरोधी पथकाने पॅडबरी जंक्शन येथे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे दहा एलएसडी पेपर सापडले असून त्याची एक लाख रुपये किंमत आहे. त्याला 15 जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

एलएसडी म्हणजे काय?

हे ड्रग्ज पावडर, टॅबलेट आणि लिक्विड अशा तिन्ही प्रकारात उपलब्ध आहे. मात्र तरुणाईकडून या ड्रग्जच्या पेपर प्रकाराला जास्त मागणी असते. या पेपरचा तुकडा जिभेवर ठेवताच किक बसते. त्यामुळे सुपर हीरो असल्याचा भास होऊन नशा करणाऱ्या व्यक्तीला आकाशात उंच भरारी घेऊ शकतो अथवा समुद्रात कितीही किलोमीटर अंतर पोहून पार करू शकतो, असा आभास होतो.

कार्टून फोटोच कोडवर्ड

ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युरोप या देशांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर काही वर्षांपूर्वी पेपर बॉम्ब हिंदुस्थानात आले. या पेपर बॉम्बवर विविध कार्टून, हॉलीवूड चित्रपटातील व्यक्तिरेखा असतात. त्यावरून या ड्रग्जची तीव्रता कमी अधिक होते.

आपली प्रतिक्रिया द्या