पोलिसांची खबर देण्यासाठी तृतीयपंथी वॉचर, ड्रग्ज माफियांची नवीन शक्कल

16
प्रातिनिधिक फोटो


आशीष बनसोडे, मुंबई

कारवाई करण्यासाठी पोलीस आले की त्यांची पटकन खबर मिळावी, पोलिसांची दिशाभूल करता यावी यासाठी ड्रग्जमाफियांनी नवीन शक्कल लढवली आहे. या कामासाठी ड्रग्जमाफियांनी तृतीयपंथीयांना हाताशी घेतले असून त्यांना वॉचर म्हणून ठेवले जात आहे. अमली पदार्थविरोधी पथकाच्या कांदिवली युनिटने दहिसर येथे केलेल्या कारवाईदरम्यान हा प्रकार समोर आला.

गेल्या आठवड्यात कांदिवली युनिटचे पोलीस निरीक्षक प्रवीण कदम व त्यांच्या पथकाने दहिसर पूर्वेकडील रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या अंबावाडी झोपडपट्टीत कारवाई केली. त्या परिसरातील मुख्य ड्रग्ज पेडलर आणि बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी वोलांदास ऊर्फ बॉस, संपूर्णा मिस्त्री आणि भारत शहा या तिघा ड्रग्ज तस्करांना पकडले होते. त्यांच्याकडून 28 लाख किमतीचा गांजाचा 70 किलो साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी रेल्वे ट्रॅक आणि झोपडपट्टी परिसरात अशा ठिकाणी पोलिसांना तृतीयपंथीय सापडले. कारवाई सुरू असताना ते जाणीवपूर्वक अधेमधे येत होते. विनाकारण मी माहिती देते, मी जागा दाखवते असे बोलून वेळकाढूपणा करीत होते. शिवाय बोलण्यात गुंतवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होते असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या तृतीयपंथीयांबाबत नंतर माहिती काढली असता ते लक्ष्मीसाठी वॉचरचे काम करीत होते असे समजल्याचेही ते म्हणाले.

फुकटचा गांजा आणि चिरीमिरी
वॉचर म्हणून ठेवलेल्या तृतीयपंथीयांना संध्याकाळी चिरीमिरी आणि फुकट गांजा दिला जातो. त्यामुळे दिवसभर कुठेही भटकण्याऐवजी काही तृतीयपंथीय ड्रग्ज तस्करांचे वॉचर म्हणून काम करीत आहेत. दिवसभर बसायचे आणि पोलीस आले किंवा त्यांचा खबऱ्या आला की माफियांना ऍलर्ट करायचे काम त्यांच्यावर सोपविले जात आहे.

तृतीयपंथीयांकडेही जबाबदारी
रेल्वे ट्रॅक तसेच झोपडपट्टीत घुसण्यासाठी असलेल्या ठिकाणी ड्रग्जमाफिया तृतीयपंथीयांना वॉचर म्हणून उभे करतात तर काहींना ड्रग्जचा साठा ठेवलाय त्या ठिकाणी तैनात करतात. पोलीस आले की इशाऱ्याने नाहीतर मिस कॉल देऊन लक्ष्मी किंवा तिच्या सहकाऱ्यांना ऍलर्ट करायचे. विनाकारण बोलण्याचा प्रयत्न करून पोलिसांची दिशाभूल करायची. मदत करतोय असे दाखवून कोण पाहिजे असे विचारायचे आणि चुकीचा मार्ग दाखवायचा. तसेच ड्रग्जमाफियांची ढाल म्हणून पोलिसांपुढे जायचे अशाप्रकारची जबाबदारी तृतीयपंथीयांवर सोपविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ड्रग्जमाफिया नेहमीच नवनवीन युक्त्या करीत असतात. दहिसरमध्ये तृतीयपंथीयांना वॉचर म्हणून ठेवणे हादेखील त्याचाच भाग आहे. तृतीयपंथीय म्हटले की कोणी पुढे जात नाही, त्यांच्यावर संशय घेता येत नाही. नेमका याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न दहिसरमध्ये ड्रग्जमाफियांकडून केला जात होता.
-शिवदीप लांडे, उपायुक्त

आपली प्रतिक्रिया द्या