कोकेन तस्करीचा ‘पडदा’फाश! 38 कोटींचा ड्रग्ज साठा सापडला

सामना प्रतिनिधी, मुंबई

जोहान्सबर्ग व्हाया युरोपला कोकेन पाठवणाऱ्या पडदा टोळीच्या अंबोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पडद्याच्या आडून ही टोळी गेल्या काही महिन्यांपासून कोकेनची तस्करी करत होती. या टोळीकडून 38 कोटी 95 लाख 97 हजार 600 रुपयांचे कोकेन जप्त केले. यंदाच्या वर्षातील अंबोली पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. निरस अझुबिक ओखोवो, मायकल संदे होप, सायमन अगोबता आणि कार्ले पिंटो आयरिस अशी आरोपींची नावे आहेत.

शहरात अमली पदार्थ विक्री करण्याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंतरराष्ट्रीय टोळीचे काहीजण घरात वापरल्या जाणाऱया पडद्यामधून कोकेनची तस्करी करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. त्या माहितीची शहानिशा पोलिसांनी केली. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 9 चे उपायुक्त परमजीतसिंग दहिया, सहायक आयुक्त राजेंद्र चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक भारत गायकवाड, पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, रवींद्र साळुंखे, गजानन सरगर, सहायक निरीक्षक विशाल गायकवाड, उपनिरीक्षक विजय गायकवाड, महिला उपनिरीक्षक फडतरे, सावंत, नादीर, बोमटे, चव्हाण, राणे, पवार, साळवी, डांगे, पाटील, पाडेकर यांचे पथक तयार केले.

शनिवारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने अंधेरी येथील मौर्या इस्टेट परिसरात सापळा रचला. त्यानंतर पोलिसांचे पथक नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे गेले. तेथे निरसच्या घरातून 78 कापडी पडदे, 624 रिंगा, रिबीन गुंडाळलेले पुठ्ठय़ाचे रीळ, 38 इंचाच्या नळ्या, टय़ूबचे गठ्ठे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्या चारहीजणांच्या विरोधात ‘एनडीपीएस’ कायद्याखाली गुन्हा नोंद केला. न्यायालयाने या चौघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कुरीयर कंपनी रडारवर
या टोळीने पडद्याआडून एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुरीयर कंपनीच्या माध्यमातून कोकेनची तस्करी केल्याची माहिती उघड झाली आहे. या टोळीने आतापर्यंत तीन वेळा कोकेनची तस्करी केल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. एका संशयित व्यक्तीच्या माध्यमातून पडदे जोहान्सबर्गला पाठवले जात होते. लवकरच त्या संशयितांच्या अंबोली पोलीस मुसक्या आवळणार आहेत. हिंदुस्थानातून जोहान्सबर्ग व्हाया युरोप अशी कोकेनची तस्करी केली जात होती.

तस्करीचा (पडदा)फाश
कोकेनच्या तस्करीकरिता या टोळीने नवीन शक्कल लढवली. ही टोळी दोन-चार दिवसांआड वाशी, कोपरखैरणे येथील मॉल्स आणि किरकोळ व्यापाऱयांकडून 5-10 पडदे विकत घ्यायची. पडद्यातील रिंगमध्ये छोटी टय़ूब टाकून त्यात 5-10 ग्रॅम कोकेन भरत असायचे. ही टोळी दिवसा बाहेर येत नसायची. या टोळीने आतापर्यंत तीन वेळा पडद्याआडून कोकेनची तस्करी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले.

तुरुंगातून बाहेर पडताच तस्करी पुन्हा सुरू
कार्ले आयरिस ही ब्राझीलची रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी तिला अमली पदार्थ तस्करीच्या गुह्यात अटक झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून ती भायखळा येथील तुरुंगात शिक्षा भोगत होती. तुरुंगातील बरॅक क्रमांक 1 मध्ये कार्लेची दादागिरी चालायची. दोन महिन्यांपूर्वीच ती शिक्षा भोगून बाहेर आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर ती निरसच्या संपर्कात आली. रिंगांमध्ये कोकेन भरण्याचे काम ती करायची. पोलिसांनी त्या चौघांकडून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याचा तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या