विमानात सीटवर लघुशंका, अज्ञात ‘मुत्तू’स्वामीचा शोध सुरू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिलेच्या सीटवर एका मद्यधुंद प्रवाशाने लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या मुलीने ट्विटरवरून परराष्ट्र मंत्री व हवाई उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार नोंदविली असून हवाई उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालण्याचे आदेश एअर इंडियाला दिले आहेत.

पीडित महिलेची मुलगी इंद्राणी घोष हीने ट्विट करत तिच्या आईसोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. ‘माझी आई एअर इंडियाच्या एआय१०२ न्यूयॉर्क नवी दिल्ली विमानाने प्रवास करत होती त्यावेळी एका मद्यधुंद प्रवाशाने त्याची पँट काढून माझ्या आईच्या सीटवर लघुशंका केली. माझी आई एकटीच प्रवास करत होती. या घटनेचा तिला प्रचंड धक्का बसला आहे.’ असे ट्विट इंद्राणी यांनी केले आहे. तसेच त्यांनी आणखी एक ट्वीट करत एअर इंडियाच्या भोंगळ कारभारावर देखील संताप व्यक्त केला आहे. ‘मी जेव्हा तक्रार करण्यासाठी एअर इंडियाच्या कॉल सेंटरवर फोन केला तेव्हा समोरील व्यक्तीने मला माझी तक्रार वेबसाईटवरील फिडबॅकमध्ये लिहायला सांगितली.’ असे दुसरे ट्वीट त्यांनी केले आहे.

इंद्राणी घोष यांनी हे दोन ट्वीट केल्यानंतर हवाई उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनी त्यावर उत्तर देत या प्रकरणात तत्काळ लक्ष घालण्याचे आदेश एअर इंडियाला दिले आहेत. तसेच हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे देखील म्हटले आहे.

SUMMARY : Drunk man allegedly pees on sit of Air india flight