आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला आणि मग…

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

आपल्याकडे आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला। झाली तयास तदनंतर भूतबाधा। चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा। अशा अर्थाचा एक श्लोक नेहमी म्हटला जातो. या श्लोकाचा तंतोतंत अर्थ बेंगळुरूमध्ये घडलेल्या घटनेवरून लावता येऊ शकतो. येथे दारूच्या नशेमध्ये धुंद झालेल्या एका माकडानं बारमध्ये धुमाकूळ घातला. माकडानं बारमध्ये टणाटण उड्या मारत सर्व सामानाची तोडफोड केली आहे. माकडाच्या या मर्कट लीलांनी वैतागलेल्या लोकांनी तेथून पळ काढण्यातच धन्यता मानली तर काहींनी याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बेंगळुरूमधील बनासवाडी इथल्या कमनहल्लीमधील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये ही मर्कट लीला झाली. उड्या मारत आलेल्या या माकडाने आधी उरलेल्या जेवणावर ताव मारला आणि त्यानंतर त्यानं ग्लासातील दारूसुद्धा प्यायली. त्यानंतर त्यानं बारमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.

दरम्यान, माकडान स्वतः दारू प्यायली की कोणी त्याला पाजली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रात्रभर माकडाने बार आणि रेस्टॉरंटमध्ये धुमाकूळ घातला. त्यानंतर रात्री उशिरा एका रिक्षाचालकानं त्याला पकडल्याचे वृत्त आहे.