दारूच्या नशेतील दोन तरुणींचा चिंचवड पोलीस ठाण्यात धिंगाणा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

दारूच्या नशेतील दोन तरुणींनी पोलीस ठाण्यातच पोलिसांना अरेरावी करत अक्षरश: धिंगाणा घातला. गोंधळ घालत ठाणे अंमलदाराला शिवीगाळ केली. हा प्रकार मध्यरात्री एकच्या सुमारास चिंचवड पोलीस ठाण्यात घडला. पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी दोन तरुणींसह तरुणाला अटक केली.

स्मिता किशोर बाविस्कर (वय २२, रा. ओटास्कीम, निगडी) प्रिया प्रदीप पाटील (वय ३०, रा. पाटीलनगर, चिखली) आणि आकाश मिलिंद कोरे (वय २५, रा. नढेनगर, कोकणे कॉलनी, रहाटणी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. पोलीस शिपाई पंकज कैलास भदाणे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन येथे रस्त्यात दुचाकीवर थांबले होते. गस्त घालणाऱ्या चिंचवड पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिघे खाली पडले. त्यामुळे तरुणींनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्यामुळे पोलिसांनी तिघांना चिंचवड ठाण्यात आणले. ठाणे अंमलदाराने चौकशी सुरू केली असता दोघींनी त्यांना ‘तुम्ही कोण विचारणारे, आम्ही आमच्या पैशांची दारू पितो आणि पिणारच, अशा प्रकारची उत्तरे देत ठाणे अंमलदारांनाच अरेरावी केली. मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला.

हा सर्व धिंगाणा पोलिसांनी आपल्या मोबाइल मध्ये चित्रित केला. सरकारी कामात अडथळा आणणे, शांतता भंग करणे आणि पोलीस ठाण्यात शिवीगाळप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.