प्रेमाची नशा चढवणारे ‘अशी कशी’ गाणे प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई

‘प्रेम हे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते’ यानुसार प्रत्येक जण प्रेमात पडल्यानंतर गुलाबी नशेत धुंद असतो. प्रेमाची ही नशा प्रेक्षकांना ‘ड्राय डे’ या संजय ए.पाटील निर्मित चित्रपटाद्वारे अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटातील ‘अशी कशी’ हे रोमँटीक गाणे नुकतेच लाँच करण्यात आले आहे. सोशल साईटवर लाँच करण्यात आलेल्या या गाण्याला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित या सिनेमात ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल ही फ्रेश जोडी आहे. या जोडीवर आधारित असलेले ‘अशी कशी’ हे गाणे, नव्याने प्रेमात पडलेल्या युगुलांना आपलेसे करीत आहे. जय अत्रे लिखित या गाण्याला हिंदीचे सुप्रसिद्ध गायक जोनीता गांधी आणि अॅश किंग यांचा गोड आवाज लाभला आहे. शिवाय या गाण्याचे चित्रीकरण काश्मीरच्या नयनरम्य ठिकाणी झाले आहे.

‘ड्राय डे’ या शीर्षकाला साजेल असा हा सिनेमा असून, प्रेमाची नशा मद्याहून अधिक सरस असल्याची जाणीव ‘अशी कशी’ हे गाणे करून देते. येत्या १० नोव्हेंबरला प्रदर्शित होत असलेल्या या आगळ्यावेगळ्या ‘ड्राय डे’ चे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांचे आहे. यात ऋत्विक आणि मोनालिसा या जोडीबरोबरच कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.