कोरड्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

1

सामना प्रतिनिधी, खेड

गेले काही दिवस कोकणात दमदार पाऊस पडत असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. जोरदार पावसामुळे उन्हाळ्यात कोरड्या झालेल्या नद्यानालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. कोसळत असलेला पाऊस असाच सुरू राहिला तर येत्या आठवडाभरात शेतीची कामे उरकतील असा विश्वास शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.

रविवार मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पाणथळ शेतांमधील लावणीच्या कामांना थोडा ब्रेक लागला होता. परंतु मंगळवारी पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा जोमाने लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. दमदार पावसामुळे उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या चिंचघर, मोरवंडे, धामणी, लवेल येथील नद्यानाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. याच नद्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात मासेमारी होऊ लागली आहे. शेतकरी शेतीच्या कामातून वेळ काढून नदीपात्रात पागाच्या सहाय्याने मासेमारी करताना दिसत आहेत.