डीएसकेंना सर्वोच्च दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याने आर्थिक अडचणीत सापडलेले पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा दावा त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे डीएसकेंना मोठा दिलासा मिळाला असून गुंतवणुकदारांना पैसे परत करण्यासाठी थोडी मुदत मिळाली आहे.

डी.एस. कुलकर्णी यांच्या वकिलांनी दावा केला आहे की, त्यांना १८ जानेवारीपर्यंत जामीन मिळाला असून त्यामुळे डीएसके यांची अटक टळली आहे.

गुंतवणुकदारांचे पैसे उच्च न्यायालयात जमा करण्यासाठी डीएसकेंना १९ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यांनी पुन्हा एकदा पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी मुदतवाढीचा अर्ज केला होता. परंतु, उच्च न्यायालयाने त्याला नकार दिल्याने डीएसकेंच्या अटकेची शक्यता होती. त्यानंतर डीएसके आणि कुटुंबीय गायब होते. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.