भीक नको पण मदत करा, डीएसकेंचे भावनिक आवाहन

सामना ऑनलाईन । पुणे

ग्राहकांना पैशाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी लोकांना भावनिक आवाहन केलं आहे. ‘मला भीक नको आहे, पण व्यवसायात पुन्हा उभारी घेण्यासाठी मदत करा’, असे भावनिक आवाहन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं.

‘क्राऊड फंडिंगमधून निधी जमा करुन लोकांचे पैसे परत करणार आहे. त्यासाठी क्राउड फंडिंग सुरू करण्यात आल्याचे डीएसके यांनी सांगितले. आपल्यासाठी दिला जाणारा हा खारीचा वाटा नसून सिंहाचा वाटा असेल. डीएसके हा माणूस फसवणार नाही हे लोकांना माहीत असून लोक आपण होऊन मदतीचा हात पुढे करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म लोकांना उभा करून देत आहे. या द्वारे निर्माण होणाऱ्या फंडातून मी पुन्हा उभारी घेईन असा आत्मविश्वास डीएसके यांनी व्यक्त केला. भविष्यात याच फंडातून माझ्यासारख्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देईन’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याआधी उच्च न्यायालयात ५० कोटी रुपये जमा करण्यात डी. एस. कुलकर्णी यांना अपयश आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी पोलिसांनी डीएसके दांपत्याची ५ तास चौकशी केली. ही चौकशी आणखी ४ दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, १३ फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीमध्ये डीएसके यांना पत्नी हेमांगीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.