सोराळा शेतवस्तीवर आग लागून गोठा जळून खाक

सामना प्रतिनिधी । नाचनवेल

येथून जवळच असलेल्या सारोळा शेतवस्तीवर अचानक लागलेल्या आगीत जनावरांसह शेती अवजारे व गोठा जळून खाक झाला. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.आगीत गाय, वासरांसह शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळ्हळ व्यक्त होत आहे.जनार्दन माणिक बनकर यांचे गट नं. २२३ मध्ये घर व लागूनच जनावरांचा गोठा आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. बुधवार, १३ रोजी दुपारी अचानक जोराचा वारा वाहू लागल्याने गोठ्याने आग धरली.

वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. गोठ्यात बांधलेली गाय, दोन कालवड, दोन शेळया, शेळीच्या दोन पिलांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. दोन वासरे दावे तोडून पळाल्यामुळे सुदैवाने वाचली. परंतु ती जखमी झाली. गाय, वासरांचा हंबरडण्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धावत येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांसह ठिबक, पीव्हीसी पाईप, मका, चारा, शेती अवजारे, टीनपत्रे, स्प्रिंकलरसह घरातील कपडे व धान्य जळून खाक झाले. घटनेत जखमी झालेल्या वासरांवर नाचनवेल येथील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ एस.एच.सरपाटे व एस.एम.मुरडकर यांनी तत्काळ घटनास्थळावर येऊन औषधोपचार केलो. सारोळा सज्जाच्या तलाठी अलका दांडगे यांनी पंचनामा केला. त्यात चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी विठ्ठल ढमाल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आग विझविण्यासाठी गावकरी धावले
आग विझविण्यासाठी कारभारी कळम, देविदास बनकर, संदीप बनकर, अशोक कच्छवे, कारभारी बनकर, प्रकाश मोरे, गजानन सोनगिरे, आजिनाथ बनकर, फकिरराव बनकर, रामदास कळम, संतोष बनकर, योगेश लेणेकर, काकासाहेब सपकाळ, बाबूराव ढमाले, रमेश बनकर, विजय गाडेकर, ज्ञानेश्वर जाधव आदींनी धावपळ करीत आग विझवली.अचानक लागलेल्या या भीषण आगीत शेतकरी जनार्दन बनकर यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही; मात्र आग शॉर्टसर्विâटने लागली असल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून वर्तविला जात आहे.