नोटबंदीचा फटका, सुरतमधील २००० हिरे कारखान्यांना टाळे

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

नोटबंदीचा फटका बसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूरत मधील तब्बल २००० हिरे कारखान्यांने टाळे ठोकावे लागले आहे. यामुळे हजारो कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

हि-यांच्या कारखान्यात रोजंदारीवर लाखो कामगार काम करतात. रोजंदारीची रक्कम साधारणतः हिरे व्यापा-यांला मिळणा-या नफ्यावर अवलंबून असते. दिवसभर काम केल्याचा मोबदला म्हणून कामगारांना रोख रकम दिली जाते. पण नोटबंदीमुळे रोखीने होणा-या व्यवसायांवर गदा आल्याने हि-यांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. यामुळे अहमदाबाद, सूरत मधील हिरे व्यापा-यांनी कारखानेच बंद केले आहेत.

सूरतमध्ये हि-यांना पैलू पाडणारे ४००० हजाराहून अधिक कारखाने आहेत. हिंदुस्थानमधून दरवर्षी एक लाख कोटींहून अधिक किंमत असलेल्या हि-यांची निर्य़ात केली जाते. यातील ८० टक्के हिरे सूरतमधून निर्य़ात केले जातात. पण नोटबंदीमुळे जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्या. पण त्या तुलनेत नवीन नोटा बँकेतून उपलब्ध होत नाहीयेत. यामुळे कामगारांना द्यायला पैसेच नसल्याने हिरे व्यापारांनी कारखानेच बंद करण्यात हित समजले आहे. हिरे व्यापा-यांच्या या निर्णयामुळे हजारो कामगार बेकार झाले आहेत.