सरदार सरोवर धरणामुळे चार राज्यांतील शेतकऱ्यांना फायदा- मोदी

सामना ऑनलाईन । दाभोई

अनेक अडथळ्य़ांची शर्यत पार करत पूर्ण झालेल्या सरदार सरोवर धरणामुळे गुजरातसहित महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या चार राज्यांतील शेतकऱ्यांचाही विकास होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.

मोदी यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून त्या धरणाचे आज त्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानिमित्त गेले पंधरा दिवस चाललेल्या नर्मदा महोत्सवाच्या सांगता सोहळ्य़ात पंतप्रधान बोलत होते. गुजरात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे भाजपने धरण लोकार्पणाच्या कार्यक्रमाला राजकीय प्रचार सभेचाच रंग चढवला होता.

सरदार सरोवर धरण हे इंजिनीयरिंगचा एक उत्कृष्ठ नमुना आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आणखी काही काळ जगले असते तर हे धरण १९६०-७०च्या दशकातच तयार झाले असते, पण नंतरच्या काळात या धरणाइतके अडथळे अन्य कोणत्याही प्रकल्पाच्या मार्गात कधी आले नाहीत. या धरणाच्या बाबतीत अपप्रचार करण्यात आला, जागतिक बँकेने कर्ज नाकारले, बांधकामात अडथळे आले, अशा परिस्थितीत या धरणाच्या उभारणीसाठी गुजरातमधील मंदिरांनी पैसा पुरवला. या धरणाच्या निर्मितीमध्ये संत-महंतांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

येथील सीमेवरील जवानांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत असल्याचे आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाहिले होते. नंतर नर्मदेचे पाणी आम्ही त्या जवानांपर्यंत सीमेवर पोहोचवले, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.