नील आर्मस्ट्राँगला परवानगी ‘सॉफ्टवेअर बग’मुळे, पालिका प्रशासनाची कबुली

(फोटो - प्रातिनिधिक)

सामना ऑनलाईन । मुंबई

नील आर्मस्ट्राँगला कोर्ट रूममध्ये बकरा कापण्यासाठी दिलेली परवानगी ही ‘सॉफ्टवेअरमधील बग’ मुळे झालेली चूक असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. तांत्रिक चुकीमुळे ही परवानगी दिली गेली असून तांत्रिक चूक शोधण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस बकर्‍याच्या धार्मिक वधासाठी ऑनलाइन परवानगी देण्याचे काम बंद राहणार आहे.

येत्या बुधवारी असलेल्या बकरी ईदनिमित्त शेळ्या व मेंढ्यांच्या धार्मिक वधासाठी पालिकेच्या देवनार पशुवधगृहातर्फे ऑनलाइन परवानगी दिली जाते. या परवानगीअंतर्गत अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग या फेक नावाने आलेल्या अर्जाला कोर्ट रूममध्ये बकरा कापण्यासाठी परवानगी दिल्याचा गंभीर प्रकार घडला. जीव मैत्री ट्रस्टने हायकोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

आतापर्यंत 100 जणांना परवानगी

सॉफ्टवेअरमधल्या तांत्रिक चुकीमुळे ही परवानगी चुकून दिली गेली आहे. ही चूक सुधारण्यासाठी तांत्रिक चूक शोधण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. बकरी ईदनिमित्त दरवर्षी लाखो बकर्‍यांची खरेदी-विक्री देवनार पशुवधगृहातून होत असते. मुंबई हद्दीत त्यांच्या केवळ धार्मिक वधासाठी पालिकेच्या अधिनियमांतर्गत अटी व शर्तींच्या आधारे ही परवानगी दिली जात असते. मुंबईमध्ये गेल्या 10 तारखेपासून बकरी ईदसाठी आतापर्यंत सुमारे 100 जणांना अशी परवानगी दिली गेली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

आतापर्यंत 28 हजार बकर्‍यांची विक्री

देवनार पशुवधगृहात दरवर्षी बकरी ईदच्या काळात मोठ्या प्रमाणावर शेळ्या, मेंढय़ाची खरेदी-विक्री होत असते. लाखो बकरे इथे विक्रीसाठी येत असतात. त्यांची शारीरिक तपासणी देवनार पशुवधगृहाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत रोज केली जाते. 64 एकरच्या परिसरात बकरे ठेवण्यासाठी 90 हजार चौ. मीटरचे निवारा वाडे तयार करण्यात आले आहेत. ठाणे, नवी मुंबई, रायगड जिह्यापासून मुस्लिम समाजातील लोक इथे बकरे विकत घेण्यासाठी येत असतात. तब्बल 15 दिवस हा बाजार सुरू असतो. या समाजातील लोकांना बकरा घरी नेऊन आपल्या प्रथेनुसारच त्याचा धार्मिक वध करायचा असतो. त्यामुळे या पशुवधगृहाबाहेर कत्तलीसाठी परवानगी दिली जाते असे अधिकार्‍यांनी सांगितले.