दुर्गाताई कुलकर्णी

1

सेलू येथे साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेविका तथा सेलूभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या दुर्गाताई कुलकर्णी यांनी प्रत्यक्षामध्येही साने गुरुजींचे विचार मुलांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य केले. कथामालेच्या निमित्ताने लेखन आणि वाचनाचा संस्कार त्यांनी मुलांवर केला. त्यांच्या निधनाने सेलू परिसरातील ‘मनमिळाऊ स्वभावाच्या ताई’ चिरंतन प्रवासाला गेल्या. सेलूच्या नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य द.रा. कुलकर्णी यांच्या त्या पत्नी होत.  ‘करील मनोरंजन जयांचे, नाते जडेल प्रभूशी तयांचे’ ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, अशी शिकवण देणाऱ्या साने गुरुजी यांनी लेखन आणि कथाकथनाच्या माध्यमातून लहान मुलांशी संवाद साधला. कथामालेच्या निमित्ताने अख्खा महाराष्ट्र जोडला. कथामालेच्या प्रचार आणि प्रसारासाठी ज्यांनी योगदान दिले, त्यात दुर्गाताईंचा सहभाग मोठा होता. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून त्यांनी शहरातील मुलांसाठी वासंतिक शिबिर, छंदवर्ग, कथामालेचे वर्ग घेतले. मुलांना समजेल अशा भाषेत त्या उत्तम कथा सांगत असत. या गुणवैशिष्टय़ामुळेच त्यांनी कथामालेचे केंद्रीय उपाध्यक्षपद भूषवले. नव्या पिढीत कथामालेच्या कार्याचा परिचय व्हावा, यासाठी हेलस येथील धडाडीचे कार्यकर्ते दत्तात्रय हेलसकर यांनी हेलस आणि सेलू परिसरात २५ वर्षांपूर्वी कथामालेची मुहूर्तमेढ रोवली. त्याचे उद्घाटन दुर्गाताईंच्या हस्ते झाले. राष्ट्रसेवा दलाच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्याच; त्याचप्रमाणे हिंदी, मराठी ग्रंथालयाच्या चळवळीतही त्यांचे भरीव योगदान होते. त्यांच्या पुढाकारातून महिला मंडळाच्या वतीने तालुक्यातील निपाणी टाकळी येथे महिलांसाठी गृहउद्योग सुरू करण्यात आला. गीताबाई चारठाणकर प्रतिष्ठानच्या वतीने बालसंस्कार वर्ग प्रतिष्ठानमध्येही त्यांनी कार्य केले. सेलू येथील विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल दुर्गाताईंचा सुभद्रा प्रतिष्ठानच्या मातृगौरव पुरस्काराने गौरव झाला होता. ताईंच्या निधनामुळे कथामालेचे कार्य करणारी सच्ची कार्यकर्ती आणि मुलांची ताई हरपली आहे.