ठसा : उषाताई लवेकर

>>दुर्गेश आखाडे

राष्ट्र सेवा दलाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि चिपळूण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई लवेकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी  निधन झाले. उषाताई यांच्या निधनाने मागील 45-50 वर्षांचा सामाजिक कार्याचा खळखळता झरा थांबला आहे. कवी वसंत बापट, प्रा. ग. प्र. प्रधान, प्रा. मधू दंडवते, नानासाहेब गोरे, एस.एम.जोशी, यदुनाथ थत्ते, भाई वैद्य, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, प्रमिला दंडवते, मृणाल गोरे, सुधाताई वर्दे यांसारख्या दिग्गजांबरोबर सेवा दलाच्या राज्य कार्यकारिणीवर काम करत त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून नानासाहेब शेटय़े गौरव पुरस्कार, राष्ट्रीय एकता ऍवॉर्ड या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

उषाताई लवेकर या रायगड जिह्यातील श्रीवर्धनच्या. 1958 साली चिपळूण येथील गोविंद लवेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढलेले आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांनी उषाताईंना घराबाहेर पडून समाजकार्य करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांच्यावरदेखील सुरुवातीपासूनच राष्ट्रसेवा दलाचे संस्कार रुजले गेले. त्यातून अन्याय-अत्याचाराविरुद्ध त्या अनेकदा रस्त्यावर उतरल्या. महागाईविरोधी आंदोलन, एसटी भाववाढविरोधी सत्याग्रह, मोर्चे, निकृष्ट धान्य वितरणाविरोधात तहसीलदारांना घेरा, एन्रॉन हटाव आंदोलन, अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन अशा अनेक लढय़ांत त्यांचा हिरिरीने सहभाग होता. सेवा दल तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. उषाताई लवेकर 1967 मध्ये पहिल्यांदा चिपळूण नगर परिषदेवर नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. शहरातील खेंड-दुर्गाळी भागातील जनतेने सलग तीन वेळा त्यांना नगरसेविका म्हणून निवडून दिले. या काळात उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. 2001 मध्ये माजी आमदार रमेश कदम यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्यावेळी जनतेतून नगराध्यक्ष निवडणुकीत त्या विजयी झाल्या. या काळात कचरा प्रकल्प, शहरात घंटागाडी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांनी शहराच्या विकासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्षपदाच्या पाच वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतरही त्यांचे सामाजिक कार्य अविरत सुरू होते. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारामुळे लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञाननिष्टा या मूल्यांवर त्यांची अखेरपर्यंत अविचल निष्ठा होती. गेली काही वर्षे वार्धक्याकडे झुकल्यामुळे त्या घराबाहेर पडत नसत. तरीदेखील घरबसल्या अडल्यानडल्यांना मदत करणे, त्यांच्या कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम त्या करत असत. कोवॅस, चिपळूण तालुका अन्नधान्य दक्षता समिती, हमाल पंचायत, एसटी कामगार संघटना, अंगणवाडी महिला कर्मचारी संघटना अशा सर्वसामान्यांशी निगडित संस्था, संघटनांशी त्यांचे निकटचे संबंध होते.