दुरान्तो: दरड कोसळल्याने इंजिनसह डबे उलटले; मध्य रेल्वेचे बारा वाजले

सामना ऑनलाईन । कसारा

रेल्वे अपघातांचे ‘विघ्न’ संपता संपत नसून आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुरान्तो एक्प्रेसचे नऊ डबे आसनगाव- वासिंददरम्यान घसरले. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर दरड कोसळत असल्याचे लक्षात येताच चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबला आणि हा भीषण अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. अचानकपणे एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरू लागल्याने प्रवाशांनी ‘बचाव…बचाव’ असा आकांत केला. दरम्यान, या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे बारा वाजले असून अनेक मेल-एक्प्रेस गाडय़ा रद्द करण्यात आल्या. धो-धो कोसळणारा पाऊस आणि त्यात ‘दुरान्तो’चा अपघात यामुळे लाखो प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

आजची सकाळ उजाडली तीच रेल्वे अपघाताच्या बातमीने. आसनगाव-वासिंददरम्यान तिसरा रेल्वेमार्ग टाकण्यात येत असून त्यासाठी डोंगर, टेकडय़ांच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या तुफान पावसामुळे येथील टेकडय़ा तसेच रेल्वे रुळालगतची जमीनही भुसभुशीत झाली आहे. पावसाचे पाणी झिरपून टेकडय़ांमधील दगड, माती थेट रेल्वेमार्गावर कोसळू लागली. धाड… धाड… आवाज करीत आज सकाळी जाणाऱया दुरान्तो एक्प्रेसच्या चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखून तातडीने ब्रेक दाबला. मात्र काही क्षणातच इंजिन अक्षरशः आडवे झाले. एवढेच नव्हे तर गाडीचे नऊ डबे रुळावरून घसरले. अचानक झालेल्या या प्रकाराने आतील प्रवासी हादरले. काहीजण तर एकमेकांच्या अंगावर पडले. सामानही पडले. लहान मुले ओरडू लागली. अनेकांनी गाडीतून उडय़ा मारण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकजण जिवाच्या आकांताने इकडे-तिकडे पळू लागला. पण काहीच करता येत नव्हते. या अपघातात हसन, त्याचा मुलगा असीफ, गंगुबाई जोरदेवर (चंद्रपूर), नंदकिशोर जिसवर (अमरावती) यांच्यासह सहाजण जखमी झाले. दोघांची नावे समजू शकली नाहीत.

सहा कर्मचाऱ्यांना शॉक

आसनगाव- वासिंद मार्गावरील वेल्लोळी या गावात झालेल्या भीषण अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱयांनी तातडीने धाव घेतली. एक्प्रेसच्या धडकेने सहा पोल कोसळले. ओव्हरहेड वायरही तुटली. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. तुटलेली ओव्हरहेड बाजूला करण्याचे काम सुरू असतानाच अर्थिंगच्या जोरामुळे सहा कर्मचाऱयांना जबरदस्त शॉक बसला. त्यात रामा मेंगाळ, यशवंत भगत, मंगळु वारघडे, रामा वाघ, सखाराम मांगे, शिवराम ठाकरे हे जखमी झाले.

प्रवाशांचे हाल

अपघातामुळे लोकल तसेच मेल-एक्प्रेसच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कल्याण ते कसारादरम्यानची वाहतूक ठप्प झाली. मुसळधार पाऊस व अपघात यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, ठाणे या स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. अनेक चाकरमान्यांना तर दांडी मारावी लागली.

या गाडय़ा रद्द

भुसावळ पॅसेंजर, राजधानी एक्प्रेस, पंचवटी, मनमाड एक्प्रेस, पुणे-भुसावळ एक्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या तर गोरखपूर, छाप्रा, पाटणा, हजरत निजामुद्दीन या गाडय़ा वसईरोड- सुरत- जळगाव या मार्गाने वळवल्या. दरभंगा एक्प्रेस, अंत्योदय एक्प्रेस, अलाहाबाद तुलसी एक्प्रेस, विदर्भ, अमरावती एक्प्रेससह असंख्य गाडय़ा अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या. कामायनी, जनशताब्दी, नंदीग्राम, फिरोजपूर पंजाब मेल, नागपूर दुरान्तो, सिकंदराबाद देवगिरी, पाटलीपुत्र, अमृतसर, वाराणसी महानगरी या एक्प्रेस गाडय़ादेखील रद्द करण्यात आल्याची रेल्वेच्या संपर्क अधिकाऱयांनी दिली..

शिवसैनिकांची मदत

अपघाताचे वृत्त समजताच आसनगाव, वासिंद, शहापूर भागांतील शिवसैनिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू झाले. शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी अपघातग्रस्त प्रवाशांना चहा, बिस्किटे तसेच पाण्याचे वाटप केले. अनेकांनी स्वतःच्या गाडय़ाही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या. जिंदाल कंपनीनेदेखील मदतीचा हात पुढे करून आपली वाहने घटनास्थळी पाठवली.

प्रवाशांच्या मदतीसाठी ‘माणुसकी एक्प्रेस’ धावली

दुरान्तो एक्प्रेसच्या अपघातानंतर मध्य रेल्वेची यंत्रणा कोलमडली तरी प्रवाशांच्या मदतीसाठी ‘माणुसकी एक्प्रेस’ मात्र सुसाट धावली. सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात होऊनही सकाळी आठपर्यंत रेल्वे प्रशासनाची कोणतीही मदत पोहोचली नव्हती. रेल्वेची वाट न पाहता वेल्होळी व परिसरातील ग्रामस्थ धावून आले. शहापूरचे तहसीलदार रवींद्र बावीस्कर, पोलीस अधिकारी विशाल ठाकूर, विविध संघटनांचे कार्यकर्ते यांनी तातडीने दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. शहापूरच्या आगार व्यवस्थापक पूनम मोरे, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे नीलेश विशे यांनीही मदत केली. रुग्णवाहिका, एसटीच्या बसेस यामुळे जखमी प्रवाशांना रुग्णालयात तातडीने दाखल करता आले. अपघातामुळे घाबरलेले अनेक प्रवासी डब्याबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मदत केली.