संभाजीनगर : शहरात धूळ, ध्वनी प्रदूषण वाढले

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहराच्या औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्येत भरमसाठ वाढ झालेली आहे. लोकसंख्या वाढीमुळे बांधकाम क्षेत्रात सातत्याने वाढ होत असून, जुनी घरे पाडून नवीन घरे बांधली जात असल्याने धुळीचे वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य झाल्याने मनपाने नवीन बांधकामासाठी धोरण ठरविणे आवश्यक आहे. तसेच औद्योगिक वसाहत आणि गुलमंडी भागात ध्वनिप्रदूषण वाढले आहे. यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा स्वरूपाच्या गंभीर त्रुटी दाखवून त्यावर शिफारशी प्रदूषण अहवालात सुचविण्यात आल्या आहेत.

तब्बल तीन वर्षांनंतर शहराचा प्रदुषण अहवाल-२०१८ आज शुक्रवारी प्रकाशित करण्यात आला. या अहवालात तज्ज्ञांनी शहरातील प्रदूषणाचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. त्या अनुषंगाने शहराच्या वातावरणाशी निगडित प्रश्न व ते सोडविण्याकरिता कार्यपध्दती तयार करणे आवश्यक आहे. संभाजीनगर हे मराठवाड्याचे मुख्यालय आहे. शहराची ओळख ही प्रामुख्याने पर्यटन व औद्योगिक शहर अशीच आहे. शहराचे वातावरण उष्ण आणि कोरडे असून, या ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच जंगल क्षेत्र कमी असल्याने उन्हाळा व हिवाळ्यात धुळीचे प्रमाण जास्त असते. त्याकरिता लोकसहभागातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रशासनाने हाती घ्यावा.

अभ्यास कक्ष स्थापन करून जनजागृती करावी
वातावरणातील प्रदूषण व त्यांचे स्त्रोत या संदर्भात अभ्यास कक्ष लवकरात लवकर स्थापन करावे, शहरात वर्दळीच्या ठिकाणी हवेतील प्रदूषण दर्शविणारे इलेक्ट्रॉनिक बोर्ड बसविणे आवश्यक आहे. दूषित वातावरणामुळे नागरिकांच्या शरीरावर होणारे वाईट परिणाम या संदर्भात अभ्यास कक्ष स्थापन करून जनजागृती करणे आवश्यक आहे. वाळुज औद्योगिक क्षेत्र व गुलमंडी परिसरात आवाजापासून होणारे प्रदूषण सर्वाधिक आहे. मनपाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आवाजाचे प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलावीत.

प्रदूषण निर्माण करणारे ८३ कारखाने
शहरातील जमिनीखालचे पाणी दूषित झालेले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, त्याकरिता जमीनीमध्ये सोडले जाणारे दुषित पाणी रोखण्यासाठी मनपाकडून कार्यवाही होणे आवश्यक आहे.तसेच शहर हे कमी पाण्याचे क्षेत्र असल्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी जनजागृती निर्माण करावी. शहरात चार औद्योगिक क्षेत्र असून, त्यापैकी वातावरणात प्रदूषण करणारे चिकलठाणा वसाहतीमधील ९, शेंद्रा ७ आणि वाळुजमध्ये ६७ कारखाने आहेत. या कारखान्यांनी नियमानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे.

दुचाकी वाहने, ऑटोरिक्षा, चारचाकी वाहने वाढली
शहरात दुचाकी वाहनांची संख्या १२ लाखांच्या वर असून, ऑटोरिक्षा २६ हजार तर चारचाकी ५६ हजार वाहने आहेत. गेल्या तीन वर्षांत वाहनांच्या संख्येत ७८ टक्क्यांची वाढ झाली आहे. वाहनांचे प्रदूषण वाढले असून, त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ऑटोरिक्षा स्टँडची संख्या १५० वरून ५०० करणे आवश्यक आहे. तसेच सातारा, देवळाई, नारेगाव, मुकुंदवाडी, मिटमिटा, पडेगाव या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होणे आवश्यक आहे. धूळ साफ करण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर मनपाकडून साफसफाई होणे आवश्यक आहे.