सुरतजवळ अरबी समुद्रात सापडली श्रीकृष्णाची द्वारका

सामना ऑनलाईन | सुरत

गुजरात डभारी गावाजवळ अरबी समुद्रात १३० फूट खोलीवर हजारो वर्षांपूर्वींचे जुने अवशेष सापडले आहेत. हा भाग सुरतजवळील ओलपाड तालुक्यात येतो. विशेषज्ञांच्या मते हा भगवान श्रीकृष्णाने वसवलेल्या द्वारका नगरीचा भाग मानला जात आहे. अरबी समुद्रात प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी गेलेल्या पथकाला हा शोध लागला आहे.

समुद्राच्या गर्भात पर्वत

सरकारकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्वारकेच्या अवशेषांचा शोध लावण्याचा प्रयत्न  केला जात आहे. २००० ते २०११ पर्यंत नॅशनल इन्स्टिटय़ूट ओशन टेक्नॉलॉजीकडून समुद्रात प्रदूषण तपासादरम्यान अवशेष आढळणे सुरू झाले होते.

१९८८ याच समुद्री क्षेत्रात आर्कियोलॉजी ऍण्ड ओशन टेक्नॉलॉजी विभागाला समुद्रात एक पर्वत आढळले होते. असे समजले जाते की, समुद्र मंथनाच्यावेळी वापरण्यात आलेल्या मेरू पर्वताचा हा भाग आहे.

खंभात ते कच्छपर्यंत पसरली द्वारका

डॉ. एस कथरोली यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथक या मोहिमेवर आहे. डभारी येथे ८०० फूट खोल खोलीवर पोचणारे आर्कियोलॉजिट मितुल त्रिवेदी यांच्या मते द्वारका एक राज्य होते. खंभात ते कच्छपर्यंत पसरलेले हे क्षेत्र होते. द्वारकेपासून सुरतपर्यंत कृष्णाचे राज्य होते. सुरतजवळ सापडलेली नगरी आणि द्वारका नगरी यांच्यात सारखेपणा आहे.

पौराणिक ग्रंथ काय सांगतात…

पौराणिक ग्रंथांनुसार, श्रीकृष्णाने मथुरेत कंस मामाचा वध केला होता. यानंतर जरासंधाने श्रीकृष्णासह यादवांचा नायनाट करण्याचा निश्चय केला होता. कृष्णाने मथुरा सोडून अरबी समुद्राच्या किनारी द्वारका नगरीची स्थापना केली. पुढे ती पाण्याची पातळी वाढून समुद्रात बुडाली.

संशोधनात भांडी, हत्यारे सापडली

समुद्राखाली हा क्षेत्रात दगडाची हत्यारे, मातीची भांडी, स्नानगृह, किमती दगड, बांगडय़ा, बैलाची शिंगे, मानवी हाडे सापडली आहेत. त्यावरून तिथे मनुष्यवस्ती असल्याच्या संशोधनाला समर्थन मिळते.