खणखणीत

3

>> द्वारकानाथ संझगिरी

ओव्हल कसोटीच्या शेवटच्या दिवशी मी अत्यंत जड अंतःकरणाने बाहेर पडलो. डॉन ब्रॅडमनच्या संघाने इंग्लडला 2-0 पिछाडीवरून 3-2 असं हरवले होते. नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लडचा सणसणीत पराभव केल्यावर एक खुळी आशा मनात उभी राहिली. विराटचा संघ विक्रमाच्या पुस्तकात डॉन ब्रॅडमनच्या संघाला कंपनी द्यायचं गोड काम करू शकेल का? ही वेडी आशा महागड्या विमान तिकिटाच्या डोलीत बसवून मला इंग्लंडला घेऊन गेली आणि साऊदम्पटनला ‘अरमानो की कश्ती टूट गयी’चा अनुभव आला.

पण मला देवाने अति आशावादी केलंय. त्यामुळे ओव्हलला पहिल्या डावात इंग्लंडने फक्त 40 धावांची आघाडी घेतली. तेव्हा मला ओव्हलवरचा 1971 चा चंद्रशेखर आठवला. इंग्लंडने 70 धावांची आघाडी घेतल्यावरही सामना आणि मालिका फिरवणारा! पण चंद्रशेखर दर दशकात जन्माला येत नाहीत. अश्विन-जाडेजा दर दोन-चार वर्षांत सापडतात. त्यांचं ते काम नव्हतंच. मग 474 धावांचे ओझं घेऊन हिंदुस्थान संघ फलंदाजीला बाहेर पडला तेव्हा 1979चा सुनील गावसकर आठवला. थेट 221 धावांचा सडा पाडणारा! पारिजातकाच्या सड्यालाही त्या धावांच्या सड्याचा हेवा वाटला असता.

प्रेस बॉक्स जवळच्या कॉमेंट्री बॉक्समधल्या गावसकरला मला सांगावसं वाटलं, ‘केस काळे कर, पॅव्हेलियनमध्ये माशा मारत बसलेल्या करुण नायरकडून तारुण्य उसनं घे आणि मॅच वाचव’ वैद्यकीय विज्ञानाला अजून तेवढं जमलेलं नाही. एकदा 1952 साली हिंदुस्थानी संघाचा धावफलक 4 बाद शून्य असा होता. कर्णधार विजय हजारे फलंदाजीला आले आणि त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. आपल्या यावेळचा 3 बाद 2 हा धावफलक हे प्रगतीचं लक्षण आहे. पण त्यानंतर हिंदुस्थानी फलंदाजांनी अचानक कात टाकली. ‘दोन तरुण फलंदाजांच्या शतकांनी आणि मोठ्या भागीदारीने सामना वाचवण्याचं स्वप्नं निराशवादी मनालाही पडलं. पण नाही, त्यावेळी ओव्हलला हिंदुस्थानची ही कसोटी संस्मरणीय करण्याची इच्छा नसावी.

त्या दोघांच्या शतकाकडे कसं पाहता येईल?

तुम्हाला कमळ पाहायचंय की चिखल याप्रमाणे!

एक गोष्ट कबूल करूया की, दोर कापण्याची भावना हिंदुस्थानी ड्रेसिंग रूममध्ये होती. त्यामुळे प्रचंड दबावाखाली त्यांना फलंदाजी करायची नव्हती. इंग्लंडच्या खात्यात प्रचंड धावा असल्यामुळे  आक्रमक क्षेत्ररचना करणं जो रूटला सोपं झालं. अशा वेळी फटक्यांना वाव मिळतो. शेवटचं दोन दिवस ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीच्या बर्‍यापैकी प्रेमात होतीच. पहिल्या डावात अशी शतकं हिंदुस्थानी संघाला सामना जिंकून देऊ शकली असती. बरं मॅच वाचली असती तरी या दोन शतकांचं मोल वाढलं असतं. शतकाच्या गळ्यात ‘यश’ किंवा पराभवापासून वाचवण्याचं मंगळसूत्र असेल तर ते शतक संस्मरणीय होतं.

थोडक्यात टीकाकाराचा चष्मा घालून या कमळांकडे पाहिलं तर आजूबाजूचा चिखल असा दिसेल.

पण कमळाचं एक स्वतःचं अंगभूत सौंदर्य असतं ना? त्याचं कौतुक करूया की, दोन्ही खेळय़ा खणखणीत होत्या. ओव्हलच्या डिप्रेसिंग प्रेस बॉक्सच्या बाहेर येऊन बसल्यावर त्यांच्या फटक्यांचा खणखणीत आवाज कानाला गोड लागायचा. दोघांकडेही भरपूर फटके आहेत आणि त्यांचा त्यांनी भाता रिता करायचा चंग बांधला होता. दोघांकडे फटके आहेत हे त्यांनी टी-ट्वेण्टी, वन डेत दाखवलं होतं, पण कसोटी ही  खरी कसोटी असते. कसोटी खेळी ही एखाद्या उत्तम लेखासारखी असते. म्हणजे अस्सल मुद्दे त्यात असावे लागतात आणि आकर्षित करणारी शैली! अभेद्य बचावात्मक तंत्र आणि टेंपरामेंट हे त्या मुद्दय़ांसारखे असते आणि फटके शैलींप्रमाणे. या दोघांना त्यांचं बचावात्मक तंत्र सुधारावं लागेल.