जागतिकीकरणाचे वारे

फोटो - बीसीसीआय

>> द्वारकानाथ संझगिरी

एजेस बाऊलच्या मैदानातून मी काल जड अंतःकरणाने बाहेर पडलो. केवढय़ा मोठ्या अपेक्षेने मी इंग्लडमध्ये शेवटच्या दोन कसोटींसाठी आलो होतो. मला हिंदुस्थानी संघाच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार व्हायचं होतं. पहिल्या दोन कसोटी गमावल्यावर पुढच्या तीन कसोटी  जिंकून जिंकलेली मालिका मला ‘याचि देही याचि डोळा’ पाहायची होती. तसा विक्रम फक्त आणि फक्त सर डॉन ब्रॅडमनच्या संघाने केला होता. आणि विराट कोहली अशा धावा करतोय की, नुसत्या धावांच्या आकड्याकडे पाहून बॅडमनलाही कौतुक वाटलं असतं. पण त्या ब्रॅडमनच्या संघात ब्रॅडमन हा एव्हरेस्ट असला तरी इतरही हिमशिखरं होती. इथे हिंदुस्थानी संघात एक गलिव्हरआहे. बाकी सर्व बुटके आहेत. आणि क्रिकेट हा सांघिक खेळ  आहे. एक अर्जुन जिंकत नाही. त्याला भीम, कृष्ण लागतात.

मी काही बाबतीत नशीबवान आहे. मी हिंदुस्थानी संघाला 1983चा विश्वचषक जिंकताना पाहिलेय. 1986 साली आणि 2007 साली इंग्लंडमध्ये मालिका जिंकताना पाहिलं. काही वर्षांपूर्वी चॅपियन्स ट्रॉफी जिंकलेलं पाहिलं. या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांच्या म्युझियममध्ये नीट मी मांडून ठेवल्या आहेत. इच्छा झाली की पुन्हा मी त्या तशाच्या तशा पाहू शकतो. त्या म्युझियममध्ये ही मालिका मला ठेवायची होती. म्हणून मी इंग्लंडला आलो आणि ते स्वप्न भंगलं. ते फक्त 60 धावांनी इतक्या चटकन भंगावं? वाईट या गोष्टींचं वाटलं की, जिंकायची संधी वारंवार आपल्या ड्रेसिंग रूममध्ये शिरू पाहात होती आणि आपण तिला बांगलादेशी घुसखोर असल्यासारखे वागवत होतो.

या मॅचचा एकएक टप्पा पहा.

इंग्लंड टॉस जिंकतेय. फलंदाजी घेतेय. तरीही त्यांची अवस्था 7 बाद 86 होतेय. सुवर्णसंधी आणखी काय असते? तरी इंग्लंडला आपण 246 धावा करायला देतो. करेनला रोखायची स्ट्रटेजी आपल्याकडे नव्हती असं वाटलं.

पुन्हा 2 बाद 141 या सुस्थितीत हिंदुस्थानी फलंदाजी होती. ती 8 बाद 195 पर्यंत कोसळावी? नेता पडला की कोसळायची पानिपतपासूनची सवय आपण एखादा ‘ठेवा’ जपावा तशी जपतोय. आणि कुणासमोर कोसळावं? मोईन अलीच्या ऑफ स्पिनसमोर? खेळाच्या दुसर्‍या दिवशी? इंग्लंडकडे सात डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे इशांत शर्माला राऊंड दी विकेट गोलंदाजी टाकावी लागणारच. त्याची पावलं म्हणजे कॅटरिना कैफची नाजूक पावलं नाहीत. त्यामुळे बूटमार्क होणारच. कुठलाही ऑफस्पिनर तिथे चेंडू टाकायला धडपडणारच. पण या सर्वांचा विचार संघाबाहेरच्या चाणक्यांनी केला असेलच ना? बरं, फक्त एकच चाणक्य नाही. तिथे अनेक आहेत. मोईन अली हा काही जीम लेकर नाही. गेल्या ऍशेसच्या मालिकेत त्याला विकेटमागे 114 धावांची किंमत देऊन फक्त पाच बळी घेता आले होते. त्याला मग वगळलं गेलं. या कसोटीसाठी त्याला बोलावलं गेलं. त्याने इंग्लंडला मॅच आणि मालिका जिंकून दिली. मोईनलाही पाच बळींच्या बोनसचं आश्चर्य वाटलं असेल. पण आश्चर्यचकित होणार्‍या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या आहेत. इंग्लंडची डावपेचात्मक आखणी ही स्विंग गोलंदाजीभोवती घुटमळत असते. फिरकी गोलंदाज ही जास्तीत जास्त त्यांची स्वीट डिश असते. तरी गेल्या वर्षी ओव्हलवर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. (पुढला सामना आपण ओव्हलवर खेळतोय. रात्र वैर्‍याची आहे!) 1938 नंतर हॅटट्रिक घेणारा तो पहिला इंग्लिश फिरंकी गोलंदाज ठरला. चार वर्षांपूर्वी याच एजेस बाऊलवर मी त्याला 67 धावांत 6 बळी घेऊन हिंदुस्थानी संघाला हरवताना पाहिलं होतं. इथेच मालिका फिरली होती आणि फिरवणारा मोईन अली होता. यावेळीही तेच झाले.

तो इंग्लिश वातावरणातला हुशार गोलंदाज आहे. बूटमार्कच्या एरियाला इंग्लंडमध्ये ‘ऑमलेट एरिया’ म्हणतात. त्याने त्या ऑमलेट एरियात चेंडू टाकला आणि पुढची जबाबदारी त्याने त्या ऑमलेटवर सोपवली. त्याने आणखी एक पथ्य पाळलं. त्याने चेंडूला उंची दिली आणि वेग थोडा कमी ठेवला. त्यामुळे चेंडू आणि खेळपट्टी यांचे चुंबन जास्त दीर्घकाळ असेल हे पाहिलं आणि म्हणून चेंडू प्रेमाने वळला. मोईनने दोन्ही डावांत हेच केले. त्यापेक्षा गुणवानी जागतिक दर्जाचा वगैरे समजल्या जाणार्‍या अश्विनने उलटं केलं. गरज नसताना अधिक वैविध्य दाखविलं. चेंडूला अधिक वेग दिला. त्यामुळे चेंडूंनी खेळपट्टीची घेतलेली निसटती चुंबनं, यामुळे अश्विनची गोलंदाजी वांझोटी ठरली.

हिंदुस्थानी फलंदाज फिरकीसमोर धडपडले की आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. कारण आपण फिरकीच्या खुराकावर वाढलेली बालकं आहोत. पण जग बदलतंय. क्रिकेटमध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहतायत. इंग्लिश संघ हिंदुस्थानी स्विंगपुढे लोटांगण घालतो आणि आपण इंग्लिश फिरकीपुढे डोकं टेकतो. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी या मालिकेत आतापर्यंत आपले 16 बळी घेतले आहेत. आणि आपल्या फिरकी गोलंदाजांनी फक्त 11 बळी घेतले. त्यातले सात अश्विनने पहिल्याच कसोटीत घेतले होते आणि त्यावेळी आपण सर्वच ‘युरेका युरेका’ ओरडलो होतो. अश्विनने हे सर्व आर्किमेडीज खोटे ठरवले.

मोईन अलीने काही बळी चांगल्या चेंडूवर मिळवले. पण त्याला ज्या बळीच्या ‘देणग्या’ दिल्या ना, त्याने तो मोठा गोलंदाज वाटायला लागला. त्यात एक मोठा देणगीदार स्वतः अश्विन होता. आल्या आल्या रिव्हर्स स्वीप मारतो? तू काय एबी डीव्हीलियर्स? रिषभ पंत, आणि हार्दिक पंड्याने सध्या तरी करेनला रोल मॉडेल ठेवावं. त्याची फलंदाजी एकदम सरळसाधी आहे. पुढचा चेंडू पुढे खेळायचा. आखूड टप्प्याचा मागे आणि चेंडूवर फटक्याचं लेबल दिसलं की किंमत वसूल करायची. म्हणजे देणगीदारांमधे त्यांची नावं येणार नाहीत. मोईनची इंग्लंडमधली क्रिकेटमागील धावांची सरासरी 32 आहे आणि इंग्लंडबाहेरची 54! हिंदुस्थानी फलंदाजांनी त्यांच्यामध्ये मुरलीधरन किंवा प्रसन्ना शोधू नये आणि त्याला बनवूही नये. जागतिकीकरण इतकं खरं करायची गरज नाही.