ई-वाचन

129

कालानुरूप बदलणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया पुस्तकांचे स्वतःचे असे अंगभूत महत्त्व. पण मोबाईल, टॅबवरही

वाचनानंद मिळवता येतो…..नीलेश मालवणकर

लोक वाचत नाही ही बोंब वर्षानुवर्षे चालत असताना त्याचवेळी दुसरीकडे हळूहळू लाखो लोक साहित्याच्या एका वेगळ्या बंधाने बांधले जाऊ लागले आहेत. हा बंध आहे ई-साहित्याचा. ‘ई-साहित्य हे कसलं साहित्य?’ असं म्हणून काहीजण नाक मुरडतील. पण ई-साहित्य हा दुर्लक्ष करण्यासारखा प्रकार राहिलेला नाही.

आंतरजालामुळे (इंटरनेट) लाखो संगणक, करोडो मोबाईल एकमेकांशी जोडले गेले. गमभन, गुगल मराठीसारख्या ऍप्समुळे संगणक, मोबाईलवर मराठी लिहिणं सुलभ झालं. एका साहित्यक्रांतीचा आरंभ झाला. मायबोली, मिसळपाव, मनोगतसारख्या साइट्सवरून जगभरातले मराठी लोक एकमेकांशी जोडले गेले. ब्लॉग्जचा उदय झाला. कथा, कविता, चारोळ्या, लेख, गजल आदी साहित्यप्रकारांचा रतीब पडायला सुरुवात झाली. स्वयंप्रकाशनाची सोय झाली, तशी प्रकाशकांना झारीतले शुक्राचार्य मानणाऱया लेखकांना हर्षवायू झाला.

ऑर्कुट, फेसबुक, व्हाट्सऍप, ट्विटर आलं. हौशी साहित्यिकांची प्रतिभा बहरली. यातूनच काही दर्जेदार लेखक, कवी उदयाला आले. आजच्या घडीला फेसबुक, व्हाट्सऍपवर शेकडो साहित्यविषयक ग्रुप्स बनले आहेत. त्यातून रोज साहित्याचा भडीमार म्हणण्याइतपत पुरवठा होत असतो. त्यातील काही साहित्य खरोखरच दर्जेदार असतंही. फेसबुक, ब्लॉग्जवर लिहिणाऱया काही लेखकांना तर कधी कधी प्रतिथयश लेखकांना हेवा वाटेल एवढी प्रसिद्धी मिळते आहे. मराठीच्या इतर बोलींमध्ये (वऱहाडी, मालवणी, अहिराणी इ.) लिहिणारे सशक्त लेखकसुद्धा बाकीच्या वाचकांपर्यंत सुलभपणे पोहोचू लागले आहेत.

विविध फेसबुक/व्हाट्सऍप ग्रुप्समधून बरेच साहित्यविषयक कार्यक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन, प्रयोग होत असतात. रहस्य व गूढकथांना वाहून घेतलेल्या एका प्रसिद्ध दिवाळी अंकात छापून आलेली व्हाट्सऍप खो कथा हे याचं उत्तम उदाहरण. या दिवाळी अंकाच्या लेखकांनी बनवलेल्या व्हाट्सऍप ग्रुपमध्ये दोन लेखकांनी एकमेकांना खो देत (आळीपाळीने एकेक भाग लिहीत) ही कथा लिहिली होती.

ट्विटरवर एका पोस्टमध्ये जास्तीत जास्त  १४० शब्द लिहिता येतात. ट्विटरवरही कथा लिहिल्या जात आहेत. ट्विटर जनरेशन म्हणून ओळखल्या जाणाऱया आजच्या पिढीच्या वाचन सवयींचा प्रभाव ई-साहित्यावरही पडतो आहे. ३०० शब्दांची कथा, शतशब्दकथा, सूक्ष्मकथा (मायक्रो टेल्स) अशा शब्दसंख्येच्या मर्यादेत कथा किंवा लेख लिहिले जाऊ लागले आहेत.

नुकतंच एक ई-साहित्य संमेलन सलग चौथ्या वर्षी फेसबुकवर भरलेलं असून यात १६ फेब्रुवारी, २०१७ ते २८ फेब्रुवारी, २०१७ दरम्यान विविध साहित्यविषयक उपक्रम राबविले जात आहेत. विविध मराठी संकेतस्थळांचे डिजिटल दिवाळी अंक, बुकगंगाचा ऑडियो दिवाळी अंक, प्रतिलिपी ऍप असेही काही प्रयोग होत आहेत.

गुटेनबर्ग डॉट कॉम हे इंग्रजीमध्ये बरीच दर्जेदार ई-साहित्य मोफत पुरवणारं संकेतस्थळ. मराठीत अशा संकेतस्थळाची उणीव आहे. पण त्या दिशेने प्रयत्न करणारी काही संकेतस्थळं मराठीत आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर शेकडो ई-पुस्तकं ई-पब, पीडीएफ व मोबी अशा विविध स्वरूपात मोफत उपलब्ध आहेत. नेटभेट, ई-साहित्य प्रतिष्ठान, बुकगंगा, डेलीहंट अशीही उदाहरणं आहेत. ही पुस्तकं डाउनलोड करून स्मार्टफोन, टॅबलेट वा संगणकावर वाचता येतात. या विविध फॉरमॅटमधील पुस्तकं वाचण्यासाठी त्या त्या प्रकारची रीडर ऍप्स (पीडीएफ रीडर, ई-पब रीडर, मोबी रीडर) डाऊनलोड करावी लागतात. आणखी एक मार्ग म्हणजे किंडल बुक्स.

काही इंग्रजी वाचनालयांमध्ये सदस्यांना ऍप्सद्वारे घरबसल्या ई पुस्तकं वाचण्याची सुविधा आहे. मराठी वाचनालयात सध्यातरी अशी सोय नाही. अलीकडेच मराठीतील काही प्रकाशकांनी एकत्र येऊन काढलेल्या ऍपवर त्यांच्या पुस्तकांसोबत काही मोफत पुस्तकंदेखील मिळतील, असं त्यांनी म्हटलंय. तेव्हा रसिकहो सज्ज व्हा ई-साहित्य वाचनानुभवासाठी. लक्षात ठेवा – वाचाल तर वाचाल!!

आपली प्रतिक्रिया द्या