नाशिकला भूकंपाचा धक्का, ३.२ रिश्टर स्केलच्या नोंद

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिकपासून चाळीस किलोमीटर अंतरावर भूकंपप्रवण क्षेत्रात सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद मेरी संशोधन केंद्रातील भूकंपमापक यंत्रावर झाली आहे, नागरिकांना मात्र याची जाणीव झालेली नाही. दरम्यान, असे लहान भूकंप होणे हे मोठा भूकंप टळण्यासाठी चांगले लक्षण असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

नाशिकपासून चाळीस किलोमीटर अंतरावर सकाळी ९ वाजून ४४ मिनिटे ३१व्या सेकंदाला ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा कालावधी १९५ सेकंद इतका होता अशी, माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिली. नाशिक हे भूकंपप्रवण क्षेत्र-३ मध्ये येते. नाशिककडून जव्हारपर्यंत, तर पुण्याकडे बोटा गावापर्यंत; दिंडोरी, पेठकडून गुजरातच्या भूजपर्यंतचा हा भूकंपप्रवण क्षेत्राचा पट्टा असल्याने नक्की कोठे धक्के बसले हे सांगता येत नसल्याचे वाघमारे म्हणाले.

जव्हारही हादरले, घरांचे पत्रे-भांडी कोसळली

मोखाडा – जव्हार तालुक्यालाही भूकंपाचा मोठा धक्का बसला. हा हादरा इतका जोरदार होता की घरांचे पत्रे तसेच भांडी खाली कोसळली. त्यामुळे जिवाच्या आकांताने नागरिकांनी रस्त्यावर पळ काढला. जव्हार शहर तसेच गरदवाडी, जुने जव्हार, काळीधोंड कासटवाडी यांसह १० किलोमीटरच्या परिसरात सकाळी ९.४५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही.