आम्ही खवय्ये : बासुंदी,जिलबी ते हिरव्या मसाल्याचे मटण

4

अभिनेते अंगद म्हसकर यांचे खाण्यावर मनापासून प्रेम आहे. वेगवेगळे व्यायाम आणि रुचकर खाणं या दोन्हीची मजा ते अनुभवतात.

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – खाणं म्हणजे पोट भरणं, पण फक्त पोट भरणं नाही तर जे खाऊन ते शरीराला लागणं. पोट भरायचं म्हणून खात नाही. पदार्थाचा आस्वाद घेत खातो. तूप, साखर, पोळी किंवा मांसाहार काहीही पुरेपूर आनंद घेत खायचं.

खायला काय आवडतं? – शाकाहारी, मांसाहारी दोन्हीही आवडतं. गोड जास्त आवडतं त्यामध्ये सगळे पदार्थ आवडतात. त्याच्यात भेदभाव काही नाही.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – खूप सोपे सोपे व्यायाम प्रकार करतो. सूर्यनमस्कार घालतो. कधी पोहायला जातो. काही वेळा घरातला केर काढतो. जीमला जातो. फक्त एकच व्यायाम प्रकार केला की, कंटाळा येण्याची शक्यता असते. त्यामुळे रोज वेगवेगळे व्यायाम करतो. घरातला केर काढून फरशी पुसणे यासारखा दुसरा बेस्ट व्यायाम नाही.

डाएट करता का? – नाही करत, कारण जे खातो ते मनापासून खातो. कॅलरी बर्न करणं असे जे काही शब्द वापरले जातात त्याप्रमाणे बर्नसुद्धा करतो. महत्त्वाचं काय सांभाळतो, तर जंक फूड खात नाही. बाकी सगळं यथेच्छ खातो.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – मांसाहारी बाहेर खात नाही. कारण घरी पत्नी सुंदर स्वयंपाक करते. शाकाहारी पदार्थांसाठी पोळी-भाजी घरगुती मिळत असेल तर त्याला प्राधान्य देतो. यासोबत दाक्षिणात्य पारंपरिक पदार्थ जिथे मिळतात तिथे जातो.

कोणतं पेय आवडतं? – चहा, पन्ह आवडतं.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – बऱयाचदा असं होतं की, बाहेरगावी दौरे असतात तेव्हा रात्रीचे प्रयोग असतात. एक-दीड वाजता प्रयोग संपला की, जेवावं लागतं. कारण प्रयोगाच्या आधी जेवणं जमत नाही. कारण प्रयोग करताना जडत्व येतं. प्रयोगानंतर जेवलो तरी पोळी-भाजी किंवा आमटी-भात असं हलकं काहीतरी खातो, मात्र ताक सक्तीने पितोच.

दौऱयानिमित्त आवडलेला खास पदार्थ ? – नाशिकला ‘ऑल द बेस्ट’चा प्रयोग होता. तिथे गुदा हलवाई आहे. त्याच्याकडे सकाळचा नाश्ता म्हणून बासुंदी आणि जिलेबी खायला गेलो. ते यथेच्छ खाल्ल्यानंतर त्या दिवशीचा प्रयोग करायला जड गेलं. त्यावेळी सगळ्याच कलाकारांनी धमाल केली.

स्ट्रीट फूड आवडतं का? – आवडतं. यामध्ये रगडा पॅटिस, वडापावही खातो. काही वेळा एखाद्या गाडीवरही छान वडापाव मिळू शकतो.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – पत्नीच्या हातचं काहीही. कारण ती अप्रतिम स्वयंपाक करते.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता? – मलई पनीर, शाही पनीर. मांसाहारी असतील मासे, मटण, आमच्या घरचं हिरव्या मसाल्यातलं मटण प्रसिद्ध आहे.

उपवास करता का? – उपवास करत नाही, पण साबुदाण्याची खिचडी मात्र आवडीने खातो.

स्वतः बनवू शकता अशी डिश ? – फक्त चहा अप्रतिम करतो.