मस्त मालवणी

नाटय़ अभिनेते दिगंबर नाईक स्वत: अस्सल मालवणी असल्याने मत्स्यप्रेमी आहेत.

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?
– ‘खाणं’ व्यक्तिपरत्वे बदलत जातं. त्यामुळे प्रत्येकासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं.

खायला काय आवडतं?
– मालवणी असल्यामुळे मला मासे जास्त आवडतात. रोज मासे नाही मिळाले तर सुका बांगडा रोजच्या जेवणात खातोच.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?
– रोजच्या आहारात मासे खातोच. कितीही आवडलं तरी प्रमाणात खातो. त्या जोडीला व्यायाम करतो.

डाएट करता का?
– डाएटच्या बाबतीत मी सतर्क आहे. तरीही नियमित डाएट करणं मला शक्य होत नाही. घराबाहेर असलो की शक्य होत नाही, पण मुंबईत असलो की डाएट करतोच. वजन वाढलं की, ते कमी होईपर्यंतच डाएट करतो.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?
दौऱयावेळी बाहेर असेन तर बाहेरचं खावं लागतं, पण मुंबईत असलो की शक्य तेवढं घरच्या जेवणाला प्राधान्य देतो. माझी पत्नी आणि मुलगी उत्तम सुगरण आहे. सगळे पदार्थ त्या घरीच करतात.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?
– मालवणी आस्वाद, सुयोग, पेनिनसुला या हॉटेलमध्ये जायला आवडतं. जिथे मालवणी पद्धतीचं जेवण मिळतं. तिकडे जायला जास्त आवडतं. मालवणीव्यतिरिक्त पदार्थ खायला आवडत नाहीत. केळीच्या पानावर जेवायला आवडतं.

कोणतं पेय आवडतं ?
– ताक आणि कोकम सरबत

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता?
– सगळ्यांसाठी घरगुती जेवण असतं. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सगळीकडेच माझे मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या घरून डबा येतो. जिथे कोणी मित्र नसतील तर बाहेर जेवतो. नागपूरचं सावजी मटण आणि पुण्यात गिरजामधलं पिठलं भाकरीचा आस्वाद आवर्जून घेतोच.

नाटकाच्या दौऱयानिमित्त आवडलेला विशिष्ट पदार्थ?
– इस्त्रायल अमेरिका, दुबई, मस्कत इथेही नाटकाचे दौरे केले आहेत. शोवर्मा हा पदार्थ इस्त्रायलमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ते मला खूप आवडलं. तिथे गेल्यावर मला ते खायची सवय लागली. युएसला खाल्लेले मॅक्सिकन, इटालियन पदार्थही मी आवडीने खाल्ले. खरे चायनीज पदार्थ तिथे खाल्ले. अॅटलांटाला माझ्या मित्राच्या पत्नीने खाऊ घातलेला सुका जवळा मी विसरू शकत नाही.

स्ट्रीट फुड आवडतं का?
– पाणीपुरी, शेव बटाटा-पुरी आणि वडापाव आवडतात. मी माझ्या स्ट्रगलच्या काळात वडापाव खाऊन राहिलो आहे. त्यामुळे आजही मी आठवडय़ातून एकदा वडापाव खातो.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?
– कुळथाची पिठी, गावचा उकडा भात त्यासोबत भाजलेला सुका बांगडा, माशाची कढी-भात

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता?
– चिकन असतच, आवर्जून सुके बोंबिल बटाटा आणि तळलेले मासे खाऊ घालतोच.

उपवास करता का?
– दर मंगळवारी आणि वर्षातले तीन नवरात्र काहीही न खाता फक्त एखादं फळ आणि पाणी भरपूर पिऊन करतो. श्रावण संपूर्ण पाळतो.

पोटा कलेजी
पोटा कलेजी बाजारातून आणल्यानंतर ती व्यवस्थित कापून धुऊन घ्यायची. त्यामध्ये मालवणी मसाला, कांदा-लसूण पेस्ट, मिरची पूड लावावी. त्यानंतर चवीपुरतं मीठ लावावे. थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवावे. नंतर अगदी कमी तेलात ही कलेजी तळावी. कारण त्याला तेल सुटतं. हा पदार्थ स्वतः बनवायला मला खूप आवडतो.