तिखट… मिखट…

नाटककार प्रताप फड यांची झणझणीत खाद्य सफर

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?
– पोट भरेल एवढच खावं. कारण ते अति केलं तरी वाईट आणि कमी केलं तरी वाईट. ‘खाणं’ मोजमापाने असलं तर ते आरोग्य आणि चव दोन्हीसाठी चांगलंच.

खायला काय आवडतं?
– मांसाहार फेव्हरेट आहे. शाकाहार आवडत नाही असं नाही, पण त्यामध्ये ठरावीक पदार्थच आवडतात. शिवाय तिखट, साधं आवडतं. तेलकट आवडत नाही.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?
– जिमला जातो. त्यामुळे डाएट दिला जात असला तरी तो माझ्याकडून नीट पाळला जात नाही, पण शक्यतो खाण्याच्या वेळा पाळण्याचा आणि पौष्टिक खाण्याचा माझा प्रयत्न असतो.

डाएट करता का?
– आहार तज्ञांनी सांगितलेलं डाएट गांभीर्याने काही महिने करत होतो, पण मागील काही महिन्यांपासून ते शक्य होत नसलं तरीही अरबट-चरबट न खाणे आणि दिवसभरात चारवेळा तरी वेळेत खाण्याची दक्षता मात्र नक्की घेतो.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?
– खूप वेळा खातो.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?
– दादरमधलं ‘गोमंतक’, टाऊनमधलं ‘बडे मियां’ या हॉटेलमध्ये ठरवून जातो. इतर हॉटेलमध्ये कुटुंबासोबत जातो.

कोणतं पेय आवडतं ?
– चहा खूप आवडतो. दिवसभरात कितीही वेळा पिऊ शकतो. सध्या तो कमी केला असला तरी तो वीक पॉइंट आहे. कधीही पुन्हा चहा पिणं सुरू करावं असं वाटतं.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता?
– मी प्रत्येक प्रयोगाला जात नाही. स्वेच्छेने दौऱयाला जाऊ शकतो. गेलोच तर त्या शहरातले वैशिष्टय़पूर्ण पदार्थ खाण्यावर भर असतो. तिथला मांसाहार बनवताना कोणते मसाले वापरले जातात. असं उपाहारगृह शोधतो जिथे घरगुती फील मिळेल. कॉन्टिनेंटल हॉटेल, तंदूर रोटी किंवा नान यापेक्षा घरगुती खातो. धाब्यावर खायला आवडतं.

दौऱयानिमित्त आवडलेला वैशिष्टय़पूर्ण पदार्थ
– कोल्हापूर हायवेवर ‘जगदंब’ नावाचं हॉटेल आहे. तिथे चुलीवर चिकन, मटन, भाकऱ्या बनवल्या जातात. मी जेव्हा जातो तेव्हा तिथे मुद्दाम जेवायला थांबतो.

स्ट्रीट फूड आवडतं का?
– पाणीपुरी, ओली भेळ आणि कधी कधी शेंगदाणे खायलाही आवडतात.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?
– मेथी, शेपू आणि भेंडीची भाजी या माझ्या अतिशय खास आवडणाऱया भाज्या आहेत. पनीर अजिबात नाही आवडत. मासेही आवडतात.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता?
– प्रत्येक वेळी निश्चित ठरवता येत नाही. तरीही प्रयत्न असा असतो की, ताटात भात, वरण, पोळी-दोन भाज्या, गोड पदार्थ असं संपूर्ण भरलेलं ताट असावं. पाहुण्यांना पूर्ण जेवण मिळाल्याचा आनंद मिळावा यावर भर असतो. पत्नी चिकन, गाजरचा हलवा असे पदार्थ छान बनवते. त्यामुळे अशा वेळी ती जे चांगलं बनवते ते खाऊ घालण्यावर भर असतो.

उपवास करता का ?
– वर्षभरात महाशिवरात्र आणि आषाढी एकादशी हे उपवास करतो.

स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी?
– चहा आणि ऑम्लेट हे दोनच पदार्थ बनवता येतात.