राजकीय पक्षांना आता बॉण्डच्या रूपात देणगी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नोटाबंदीनंतर राजकीय पक्षांना रोख रकमेच्या रूपात फक्त २ हजार रुपयांची देणगी स्वीकारण्याची परवानगी  असताना आता त्यापेक्षा जास्त रकमेच्या देणगीसाठी केंद्र सरकार लवकरच व्याजमुक्त इलेक्ट्रिक बॉण्ड आणणार आहे. त्यामुळे आता सगळय़ा राजकीय पक्षांना दिली जाणारी देणगी ही बॉण्डच्या स्वरूपात असणार आहे. हे बॉण्ड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही मोजक्या शाखांमध्ये उपलब्ध असतील. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. देणगीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी देणगीदारासाठी आपले केवायसी माहिती देणे बंधनकारक आहे.

अरुण जेटली यांनी २०१७चे अर्थसंकल्प सादर करताना राजकीय पक्षांना मिळणाऱया देणगीतील नियमांमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी आरबीआय कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. देणगीदारांना नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या खात्यात असे इलेक्ट्रिक बॉण्ड देणगीच्या रूपात जमा करता येतील.

  • जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात १० दिवसांत हे बॉण्ड  विक्रीसाठी उपलब्ध असतील.
  • मात्र, सार्वत्रिक निवडणुकांवेळी ३० दिवसांसाठी हे बॉण्ड उपलब्ध असतील.
  • हे बॉण्ड १ हजार, १० हजार, एक लाख, १० लाख आणि एक कोटींमध्ये उपलब्ध असतील.
  • बॉण्डबरोबर चेक आणि ड्राफ्टने दिली जाणारी देणगीही स्वीकारली जाणार आहे.