निवडणूक आयोग मोदींच्या दबावाखाली काम करतं; काँग्रेसचा आरोप

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साबरमतीमधील राणिप येथील केंद्रावर मतदान केलं. मतदानानंतर मोदींनी कारच्या फूटबोर्डवर उभं राहून लोकांना अभिवादन केलं. यावर काँग्रेसनं आक्षेप घेत याला रोड-शो म्हणत मोदींवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोगावरही काँग्रेसनं निशाणा साधला आहे. काँग्रेसनं याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. संध्याकाळी ५ नंतर याबाबत कारवाई केली जाईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, गुजरात निवडणूक आयोगाला त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला आहे. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालय यांच्या दबावाखाली काम करत आहे. आचारसंहितेचा भंग करत मोदी रोड-शो करत असून निवडणूक आयोगाने याकडे कानाडोळा केला असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.

निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या बाबतीत वेगळा न्याय आणि भाजपच्या बाबतीत वेगळा न्याय दिला आहे. निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांच्या मुलाखती गुजरातमधील चॅनेल्सवर दाखवण्यातवर बंदी घातली. राहुल गांधीची मुलाखत घेणाऱ्या चॅनेलविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली तसेच राहुल गांधीनांही नोटीस पाठवण्यात आली. मात्र भाजपने रोड शो केला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई निवडणूक आयोगाने केली नाही. त्यामुळे निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदीच्या पर्सनल सेक्रेटरी असल्याप्रमाणे काम करत आहे का? असा सवालही काँग्रेसनं उपस्थित केला आहे.