मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता

4


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकांसाठी तारखांची घोषणा निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुका किती टप्प्यांमध्ये होतील आणि कोणत्या महिन्यात होतील, याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. सुरक्षा दलाची उपलब्धता आणि इतर बाबींचा विचार करून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीर विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांसोबत घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकासांठी वेगळी सुरक्षा व्यवस्था आणि इतर तयारी करण्याची गरज नसते. त्यामुळे खर्च आणि आयोगावरील ताणही कमी होतो. जम्मू कश्मीरची विधानसभा नोव्हेंबर 2018 मध्ये बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे सहा महिन्यात म्हणजे मे महिन्यांपर्यंत तेथील विधानसभा निवडणुका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांसोबतच जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याबाबत आयोग विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, जम्मू कश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार आहे. गरज भासल्यास लोकसभा निवडणुकांपूर्वीही जम्मू कश्मीरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या