10 वर्षांपासून ‘हे’ हात घडवताहेत पर्यावरणस्नेही बाप्पा!

>>>ज्योत्स्ना गाडगीळ

यावर्षीपासून गणेशोत्सवात थर्माकोलचे दर्शन होणार नाही. येत्या काही काळात अशीच अंमलबजावणी पीओपी मूर्तींच्या बाबतीत होऊ शकते. म्हणून बदलापूर येथील मूर्तीकार रवींद्र कुंभार यांनी मागील दहा वर्षांपासून कास धरली आहे, पर्यावरणस्नेही बाप्पा बनवण्याची! तुम्ही कधीपासून होताय, पर्यावरणस्नेही?

‘विघ्नहर्ता’ बाप्पाला `विघ्नकर्ता’ बनवला, तो आपण! शाडूच्या मूर्ती जड असतात, त्या पटकन तुटतात, महाग असतात, असा गैरसमज करून घेत, आपण प्राधान्य दिले पीओपीच्या मूर्तीला. त्या मूर्तींचे विसर्जन केले, तरी त्या पर्यावरणाशी एकरूप होत नाही. प्रदुषणाला हातभार लागतो आणि विसर्जनानंतर मूर्तींचे भग्न अवशेष समुद्रठिकाणी, नदी किनाऱ्यांवर, तलावाकाठी पडलेले दिसतात. ते पाहून, मन हेलावते आणि दहा दिवस मखरांत बसवलेला हाच का तो बाप्पा? असा प्रश्नही पडतो.

kumbhar-4
कुंभार ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी बनवलेली आजोबांची प्रतिकृती.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी बदलापूरचे मूर्तीकार रवींद्र कुंभार यांनी पुढाकार घेतला आणि मागील दहा वर्षांपासून पर्यावरणस्नेही बाप्पा बनवण्यास प्राधान्य दिले. त्यांच्या कारखान्यात शाडूच्या, कागदाच्या लगद्यापासून बनलेल्या आणि त्यांनी संशोधन करून तयार केलेल्या विशिष्ट मातीच्या मूर्ती विक्रीसाठी असतात.

ते सांगतात, `शाडूची मूर्ती बनवायला अधिक वेळ आणि कौशल्य लागते. त्यामुळे इतर मूर्तीकारांकडे शाडूच्या मूर्ती पीओपी मूर्तीच्या तुलनेत थोड्या महाग असतात. परंतु, भाविकांनी पर्यावरणस्नेही शाडूच्या मूर्तीला पसंती द्यावी, म्हणून मी पीओपीच्या दरात शाडूची मूर्ती विकतो. आपसुकच माझ्याकडे शाडूची मूर्ती घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. मात्र, शाडूच्या मूर्तीला आघाताने तडा जाऊ शकतो आणि तडा गेलेली, भग्न झालेली मूर्ती पाहून भाविकांच्या श्रद्धेलाही धक्का बसतो. यावर पर्याय म्हणून मी झाडाचा डिंक, शेतातली माती, शाडूची माती आणि वाळलेला पाचोळा एकत्र करून नैसर्गिक रित्या विशिष्ट माती विकसीत केली. ती माती कागदाच्या लगद्यावर बसवून घडवलेली मूर्ती तुटत तर नाहीच, पण विसर्जन केल्यावर अवघ्या २० मिनिटांत पाण्यात पूर्णत: विरघळते. नैसर्गिक रंग वापरल्याने प्रदूषणही होत नाही. भाविकांनी घरातच मूर्ती विसर्जित केली आणि पाण्यात विरघळलेली माती कारखान्यात आणून दिली, तर तिच्या वजनाइतकी किंमत पुढच्या वर्षीच्या गणेशमूर्तीतून आम्ही कमी करून देतो. यासर्वांत माझा वैयक्तिक फायदा होत नाही, हे सर्व मी सामाजिक जाणिवेतून करत आहे.’

कुंभार यांच्या बोलण्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. त्यांचे घर पाहता, त्यांच्या बोलण्याची प्रचिती येते. बदलापुर स्थानकापासून दूर बोराडपाडा रोडवर स्थित `कृष्णाई’ नावाचा त्यांचा मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे. त्याला लागूनच असलेले झोपडीवजा घर. घरातील सामानापेक्षा कारखान्याचाच पसारा जास्त दिसतो. कुंभार यांची पत्नी, मुलगी आणि मूर्तीकाम शिकायला येणाऱ्या कारागीरांचा घरात राबता असतो. मोठा मुलगा कर्जत तालुक्यात खाजगी नोकरी करतो, तर धाकटी मुलगी हर्षदा त्यांच्या व्यवसायाला हातभार लावते. मूर्ती बनवते, रंगकाम करते, तसेच मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे कुठे आयोजन केले असेल, तिथे वडिलांबरोबर सहाय्यक म्हणूनही जाते. मूर्तीकामाचे धडे ती वडिलांकडून गिरवत आहे. त्यातले बारकावे शिकत आहे. तिला या कलेची आवड आहे. घराला आर्थिक हातभार लागावा, म्हणून तीदेखील वडिलांबरोबर दिवस-रात्र मेहनत घेत आहे.kumbhar-5

साधारण पन्नाशीचे असलेले कुंभार, बालपणापासून ह्या व्यवसायात आहेत. नव्हे, तर हा व्यवसायच त्यांच्या घरात आहे. त्यांचे वडील, आजोबा मूर्तीकार. तेदेखील शाडूची मूर्ती साकारायचे. माती खराब होईल, म्हणून कुंभार यांना आजोबांच्या कार्यशाळेत प्रवेश नसे. तरीदेखील हट्टाने ही बालमूर्ती शेतातील मातीची गणपती मूर्ती बनवत असे. कुंभार सात वर्षांचे असताना, त्यांच्या आजोबांचे निधन झाले. आजोबांच्या विरहात त्यांनी आजोबांची हुबेहुब मूर्ती साकारली. सर्वांनी त्यांचे कौतुक केले. (ती मूर्ती आजही कुंभार यांनी जपून ठेवली आहे.) तिथपासून त्यांनी मूर्तीकलेचा ध्यास घेतला आणि शिक्षण अर्ध्यातून सोडून देत मूर्तीकलेत स्वत:ला झोकून दिले.

कौटुंबिक कलहामुळे ऐन उमेदीच्या काळात त्यांनी राहत्या कपड्यानिशी घर सोडले आणि अनेक घाव सोसून स्वत:ची ओळख तयार केली. आता, पर्यावरणस्नेही मूर्तीकार अशी बदलापुराात त्यांची ओळख बनली आहे. पैशांची निकड असताना प्रसंगी त्यांनी गवंडी कामही केले. एका कारखान्यात मोल्ड बनवण्याचे काम स्वीकारले. तिथे त्यांना फायबरची मूर्ती बनवण्याचे तंत्र शिकून घेता आले. तेच काम त्यांच्या चरितार्थाचे साधन बनले आहे.

कुंभार, हे केवळ गणपती आणि देवीची मूर्तीच नाही, तर अतिशय रेखीव मानवी पुतळेही बनवतात. त्यासाठी लागणारे साचेसुद्धा आपणच तयार करतात. कोणाला हवे असल्यास देतात. असे अनेक लहान-मोठे साचे त्यांच्या कारखान्यात पहायला मिळतात.

कुंभार हे गणपती-देवी मूर्तीकाम `ना नफा, ना तोटा’ ह्या तत्त्वावर करतात. मूर्तीकार मिळत नाहीत, म्हणून काम अडून राहू नये, यारीता ते स्वत: जवळील माती, साहित्य देऊन विद्याथ्र्यांना मूर्तीकलेचे प्रशिक्षण देतात. आजवर अनेक शाळांमधून, संस्थांमधून त्यांच्या एकदिवसीय मूर्तीकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बदलापुर येथील सामाजिक, राजकीय संस्थांनीदेखील त्यांना संधी दिली, परंतु हा विषय लावून धरला नाही. पाठपुरावा केला नाही. आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे त्यांना लोकांपर्यंत पोहोचणे अवघड होऊ लागले.

तसे असले, तरी प्रसारमाध्यमांनी कुंभार यांच्या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या पर्यावरणस्नेही मूर्तीकामाची वेळोवेळी दखल घेतली. प्रसिद्धी दिली. मात्र, अपेक्षित आकडा गाठता आला नाही, याचे शल्य ते बोलून दाखवतात. भविष्यात शाडूच्या मूर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे, तरी लोकांनी स्वत:चा बाप्पा स्वत: तयार करावा, असा आग्रह ते करतात.

कुंभार ह्यांनी बनवलेल्या पर्यावरणस्नेही मूर्ती!
कुंभार ह्यांनी बनवलेल्या पर्यावरणस्नेही मूर्ती!

कुंभार यांच्याकडे असलेल्या शाडूच्या मूर्ती केवळ पर्यावरणस्नेही नाहीत, तर वजनालाही हलक्या असतात. पीओपीचा एखादा पाच फुटाचा गणपती उचलण्यासाठी जिथे किमान आठ जण लागतात, तिथे कुंभार ह्यांच्या मुशीतून घडलेली मूर्ती फक्त दोघे जण सहज उचलू शकतात.

या सर्व वैशिष्ट्यांमुळे कुंभार यांनी साकारलेली मूर्ती `मंगलमूर्ती.कॉम’ वरून थेट ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचली आहे. सदर संकेतस्थळावर त्यांच्या मूर्तीचे वर्णन केले होते. त्यावरूनच कुंभार ह्यांनी घडवलेल्या बाप्पाला परदेशात जाण्याची संधी मिळाली.

शिक्षण अर्धवट सोडल्याने आजच्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना कुंभार हतबल होतात. गावकुसाबाहेर राहत असल्याने लोकांपर्यंत पोहोचणेही त्यांना अवघड जात आहे. त्यांच्या प्रयत्नांना तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तर त्यांच्या कलेला यथोचित मोल मिळू शकेल. तसेच, मोठ्या प्रमाणात पर्यावरणस्नेही भाविक घडवण्याचे त्यांचे स्वप्नही साकार होऊ शकेल.

कुंभार यांना `महाराष्ट्र कला गौरव’, `कुंभार मित्र’ अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, भाविक जेव्हा पर्यावरणस्नेही बाप्पाचा पुरस्कार करून पीओपीचा वापर पूर्णत: बंद करतील, तो आपल्यासाठी सर्वोच्च पुरस्कार असेल, असे कुंभार सांगतात. `मी मोफत शिकवण्यासाठी तयार आहे, तुम्ही मोफत शिकण्यासाठी पुढाकार घ्या!’, असे आवाहन ते करतात.

तुम्हालाही पर्यावरणस्नेही व्हायचे असेल, तर संपर्क साधा: ९९२२१२७९६२/ ९८८१६३४६७५/ ९४२२४८९२५७