थर्माकोलला “इको फ्रेंडली” मखरांचा पर्याय

>>कविता लाखे। मुंबई

आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलंय. पण पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टीक व थर्माकोलवर यावर्षी महाराष्ट्र सरकारने बंदी घातल्याने बाप्पाची आरास करायची कशी असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे. चाणाक्ष दुकानदारांनी भाविकांची हीच अडचण लक्षात घेत पुठ्ठ्याचे, प्लायवुडचे फोल्डींग मखर बाजारात आणले आहेत. थर्माकोलच्या मखराला हे ‘इको फ्रेंडली’ मखर उत्तम पर्याय ठरतं आहेत.

putha-2

काही जणांनी कागदाच्या व सॅटीनच्या फुलांची आरास केलेल्या कमानीचं बाजारात आणल्या आहेत. तर दिसायला आकर्षक व वजनाने हलके असलेले पुठ्ठ्याचे मखर व सॅटीनच्या कमानीही भाविकांच्या पसंतीला उतरत आहेत. वजनाने हलके व अनेक वर्ष टिकणारे हे मखर पैसा वसूल करून देणारे असल्याचा दावा दुकानदार करत आहेत. त्यातच या इको फ्रेंडली मखरला ‘चार चांद’ लावण्यासाठी लाकडाची बारीक चायनीज फुलही बाजारात दिसू लागली आहेत. पुठ्यांच्या मखराची किंमतही सामान्यांच्या खिशाला परवडणारी असल्याचा दावा बोरिवलीतील दुकानदारांनी केला आहे. तर सॅटीनच्या फुलांच्या मखरांची सजावट असलेले मखर दिसायला आकर्षक असले तरी खिशाला कात्री लावणारे आहेत, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. पण बाजारात इतर पर्यायच उपलब्ध नसल्याने मिळेल ते विकत घ्यावे लागतं आहे, अशी खंत महिला ग्राहकांनी व्यक्त केली आहे. या इको फ्रेंडली मखराच्या तुलनेत थर्माकोलचे मखर परवडणारे होते, असेही काही ग्राहकांनी म्हटले आहे. तर लालबागमधील ‘उत्सवी’ ब्रँडच्या पुठ्ठ्यांच्या मखरांना नागरिकांकडून विशेष मागणी आहे.

flower-pt

सामान्यांच्या खिशाला परवडणारे हे मखर असून तुम्ही तो वापरून नीट सांभाळून ठेवू शकता. पुढील वर्षी पुन्हा वापरू शकता. त्यामुळे ग्राहकांची उत्सवीच्या मखरांना अधिक पसंती आहे.

flower-22

तर दुसरीकडे काहीजणांनी रंगीबेरंगी पडदे वापरून गणपतीची सजावट करण्यावर भर दिला आहे. पडद्याचा कपडा वापरायला हलका व विविध रंगात सहज उपलब्ध होत असल्याने गणपतीच्या टेबलभोवती पडदे लावून आरास करण्याचा पर्याय निवडणाऱ्यांची संख्याही यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. तशातच या पडद्यांना लाकडाची विविध आकार व रंगातील चायनीज फुले लावून सजावटीचे सौंदर्य अधिक खुलवताही येते. चायनिज लाईटींग व तोरणेही वेगवेगळ्या स्वरुपात बाजारात आले आहेत. थोडी कल्पकता वापरून त्यांचीही उत्तम आरास करता येऊ शकते. यामुळे यावर्षी बाजारात थर्माकोल व प्लास्टीकच्या फुलांची आरास नसली तरीही त्याला अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

flower-2

summary-eco friendly makhar best option for thermacol