वकील झाले सेक्स वर्कर, सरकारी अधिकारी करताहेत घरकाम

सामना ऑनलाईन । व्हॅलेन्सिया

एकेकाळी देशाच्या प्रशासनात अधिकारी म्हणून काम करणाऱ्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सध्या घरगडी म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. मोठे मोठे वकील, न्यायाधीशांनी देखील इतर देशांमध्ये वेश्याव्यवसाय करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती आहे आर्थिक व्यवस्था डबघाईला गेलेल्या व्हेनेझुएला या देशाची. गेल्या काही वर्षांपासून व्हेनेझुएला या देशाची ‘दिवाळखोरीकडे’ वेगाने वाटचाल सुरू झाली आहे.

२०१४ नंतर खनिज तेलाचे जागतिक भाव कोसळल्यानंतर ज्या देशांची आर्थिक अधोगती वेगाने सुरू झाली त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या दक्षिण अमेरिकेतील देशाकडे खनिज तेलाचे भरपूर साठे आहेत. व्हेनेझुएलाची लोकसंख्या तीन कोटी आहे. अनेक वर्षे या देशाचे नेतृत्व ‘चावेज’ यांच्याकडे होते. दुर्दैवाने त्यांच्या व्हेनेझुएलातील कारकिर्दीत त्या देशाने शेती, पर्यटन, फलोत्पादन असे इतर आर्थिक स्रोत शोधण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे त्या देशाची ९० टक्के अर्थव्यवस्था खनिज तेलाच्या उत्पन्नावरच अवलंबून होती. खनिज तेलाचे भाव घसरल्यामुळे या देशात सध्या अराजकता माजली आहे. दररोज व्हेनेझुएलातील पाच हजार नागरिक स्थलांतर करत आहेत. या देशातील वकील, न्यायधीश यांच्यावर शरीरविक्रय करण्याची वेळ आली आहे. तर मोठे अधिकारी देखील घरगडी म्हणून काम करत आहेत.

व्हेनेझुएलाचे अमेरिकेकडे असणारे ‘बॉण्ड्स’ही व्हेनेझुएलाने विकून त्यातून काही निधी उपलब्ध केला होता, परंतु जागतिक आर्थिक पत घसरल्यामुळे इतर देशांनीही व्हेनेझुएलाला मदत बंद केली. सहा महिन्यांपूर्वीपासूनच व्हेनेझुएलातील अनेक ‘मॉल्स’मधून जीवनावश्यक गोष्टी मिळेनाशा झाल्या. नंतर नंतर तर तेथील दवाखाने, रुग्णालयांमधून जीवनावश्यक औषधेही मिळेनाशी झाली आहेत.

SUMMARY : ECONOMICS CRISES IN VENEZUELA