‘ईडी’चा समीर भुजबळांच्या जामिनाला विरोध कायम

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांना जामीन देण्यास अंमलबजावणी संचालनालयाचा विरोध कायम असून त्यांच्या जामीन अर्जावर उद्या, बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालय आपला निकाल देणार असून समीर भुजबळ सुटणार की तुरुंगातच राहणार याचा निर्णय होणार आहे. समीर भुजबळ यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला असून या अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५(१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्या आधारावर छगन भुजबळ यांना जामीन देण्यात आला आहे. या रद्द कलमाच्या आधारावर आपल्यालाही जामीन द्यावा अशी विनंती समीर भुजबळ यांनी केली आहे. त्यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी कोर्टाला सांगितले की, पीएमएलए कायद्यात २९ मार्च रोजी पुन्हा नव्याने दुरुस्ती करण्यात आली असून त्यामुळे आता समीर भुजबळ यांना जामीन देता येणार नाही. याप्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.