झाकीर नाईकची 16 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक विरोधात ईडीने फास आवळला आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने मनी लाँडरिग कायद्यातंर्गत झाकीर नाईकची 16.40 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने शनिवारी याबाबतची माहिती दिली. मुंबई आणि पुण्यात नाईकच्या कटुंबीयांच्या नावे असलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्याचे ईडीने सांगितले. मनी लाँडरिंगद्वारे मिळालेला पैसा लपवण्यासाठी नाईकने पत्नी, मुलगा आणि पुतण्याच्या नावावर संपत्ती खरेदी केल्याचे ईडीने सांगितले. जप्त केलेल्या संपत्तीची अंदाजीत किंमत 16.40 कोटी असल्याचे ईडीने सांगितले.

मुंबईतील फातिमा हाईट्स आणि आफिया हाईट्स यांचा जप्त केलेल्या संपत्तीत समावेश आहे. तसेच भांडुपमध्येही त्यांची संपत्ती सापडली आहे. पुण्यातील एन्ग्रेसिया नावाचा प्रोजेक्टही जप्त करण्यात आला आहे. मनी लाँडरिंगद्वारे मिळालेला पैसा लपवण्यासाठी नाईकने या संपत्तीची खरेदी स्वतःच्या नावावर केली नव्हती. सुरुवातीला त्याने स्वतःच्या नावाने नोंदणी करून नंतर पैसा पत्नी, मुलगा आणि पुतण्याच्या खात्यात वळवला होता. त्यानंतर या संपत्तीची नोंदणी कुटुंबीयांच्या नावे करण्यात आली.

आतापर्यंतच्या तपासातून नाईकच्या मनी लाँडरिंगबाबतची माहिती मिळाल्याचेही ईडीने सांगितले. एनआयएने नाईकविरोधात बेकायदा कृत्य केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने डिसेंबर 2016 मध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या