मोदी तीन दिवसांत हजर झाला नाही तर…

28

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील बँकांमधला महाघोटाळा ठरलेल्या नीरव मोदी प्रकरणात सक्तवसुली महासंचालनालयाने (ईडी) कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ईडीने नीरव मोदीविरोधात तिसरा समन्स जारी केला असून तीन दिवसांत मोदीने हजर राहावे अन्यथा प्रत्यार्पणाची कारवाई सुरू होईल असा इशारा दिला आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पीएनबी घोटाळ्यानंतर मोदीने स्वतः समोर येण्यासाठी ईडीने आतापर्यंत दोन समन्स पाठवले होते. मात्र, त्याच्या उत्तरादाखल मोदीने आपण परदेशात अत्यंत व्यग्र असून तूर्तास आपल्याला समन्सचं उत्तर देण्यासाठी हजर राहता येणार नाही, असं सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात शेवटचा इशारा म्हणून हा तिसरा समन्स पाठवण्यात येणार आहे. जर या समन्सनंतरही मोदी प्रत्यक्ष हजर झाला नाही. तर मात्र, प्रत्यार्पणाच्या कारवाईला सुरुवात करण्यात येईल, असं ईडीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

नीरव मोदीने ११ हजार ४०० कोटींचा घोटाळा केल्याचं उघड झाल्यानंतर त्याच्या विदेशी गुंतवणुकीही समोर आल्या आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये त्याने पैसे ठेवलेले असल्यामुळे ईडी विदेशी न्यायालयांना यासंबंधी लेटर रोगट्री पाठवणार आहे. लेटर रोगट्रीच्या माध्यमातून मोदीविरुद्ध पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, नीरव मोदीच्या हिंदुस्थानातील सर्व संपत्तीवर जप्ती आली असून त्याच्या वैयक्तिक वापरातल्या आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या