गर्व से कहो हम हिंदू है!

परदेशातून येणार्‍या पैशांचा हिशेब मागण्यासाठी मदरसे, मशिदींवर आयकर विभागाचे शूर अधिकारी धाडी घालतील काय? पण तेवढी हिंमत या लोकांत नक्कीच नाही. शेवटी धाडी घालण्यासाठी सरकारला मंंदिरांचे पुरोहितच सापडले. काँग्रेस पक्षावर पांघरूण घालावे असा हा निधर्मीवाद आहे. काँग्रेस, मुलायमसिंह किंवा लालू यादवांचा निधर्मीवाद झक मारेल अशी कामगिरी पुरोहितांच्या जानव्यास हात घालून बजावण्यात आली. तेव्हा लोकहो, गर्व से कहो हम हिंदू हैं! मग अयोध्येत राम मंदिर झाले नाही तरी चालेल!

त्र्यंबकमधील पुरोहितांवर हल्ला
हिंदुस्थानात सध्या काळ्या पैशांविरुद्ध लढाई सुरू आहे; पण काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारी यंत्रणा कधी कुणाच्या घरात घुसेल याचा नेम नाही. आयकर विभागाने आता त्र्यंबकेश्‍वरमधील पुरोहित मंडळींच्याच जानव्याला हात घातल्याने महाराष्ट्रातील समस्त पुरोहित वर्ग सरकारला शाप देत असेल. त्र्यंबकेश्‍वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे व येथे इतर धार्मिक पूजाविधीबरोबरच श्राद्ध, नारायण नागबळींसारखे विधी केले जातात व अशा विधींसाठी येथे देशभरातून श्रद्धाळू म्हणा किंवा अंधश्रद्धाळू म्हणा रोज शेकडो लोक येत असतात. या लोकांचे स्वागत करून त्यांचे विधी करून घेणे हा येथील पुरोहित मंडळींचा परंपरागत व्यवसाय आहे. या पुरोहित मंडळींकडे बर्‍यापैकी पैसाअडका असावा असे म्हटले जाते; पण हा पैसा असून कितीसा असणार? आणि असला तरी तो काही मटका किंवा दारूची ठेकेदारी करून मिळविलेला नाही. दिवसभर उन्हात-पहाटेच्या थंडीत पौरोहित्य करून ही कष्टाची कमाई असायला हरकत नाही. यापैकी दोनेक पुरोहितांकडे प्रत्येकी ‘कोटी’भर रकमांचे घबाड सापडले व त्यामुळे समस्त पुरोहित वर्गास बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि सर्वत्र त्याबाबत बातम्या प्रसिद्ध होत आहेत. खरे म्हणजे काळा पैसा जमा करण्यासाठी आयकर विभागाने त्र्यंबकेश्‍वरातील पुरोहितांकडे धाडी घालाव्यात हे तसे एक कोडेच आहे. कारण काळा पैसा नक्की कुणाकडे आहे, असा प्रश्‍न यामुळे निर्माण होतो. महाराष्ट्र ही साधूसंतांची, देवादिकांची भूमी आहे व शिर्डीपासून पंढरपूर, अष्टविनायकापर्यंत अशी अनेक धर्मस्थाने येथे आहेत. तेथे
हजारो लोक पौरोहित्य
करीत असतात. पंढरपूर, जेजुरी, शेगाव ही बहुजनांची तीर्थस्थाने आहेत. मग उद्या अशा सगळ्याच तीर्थक्षेत्रांवरील पुरोहितांवर धाडी घालून त्यांना आरोपी केले जाणार आहे का? काळा पैसा ही समाज आणि अर्थव्यवस्थेस लागलेली कीडच आहे. ती काढूनच टाकायला हवी. सामान्य माणसाकडे थोडाफार अतिरिक्त पैसा आहे असे गृहीत धरले तरी तो त्याने चोर्‍या करून, डाके टाकून मिळविलेला नसतो. आयुष्यभर काबाडकष्ट करून, पोटाला चिमटा देऊन सामान्य माणूस पैसा साठवत असतो हे लक्षात घेतले पाहिजे. काळा पैसा शोधायला, जप्त करायला कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. फक्त या कारवाईचा बडगा केवळ सामान्य माणसावर, त्यातही हिंदूंवर उगारला जाऊ नये इतकेच. बाकी जी इतरही बरीच काळ्या पैशावाली मंडळी आहे त्यांच्यावरही कारवाई करा, मात्र ज्यांच्याकडे चिल्लर आहे ते काळा पैसेवाले व ज्यांच्याकडे दोन हजारांच्या नव्या गुलाबी नोटांचे डोंगर रचले आहेत ते ‘प्रामाणिक’ (?) अशी बेइमानांची नवी व्याख्या निर्माण झाली असून सामान्य जणांना बेइमान ठरविण्याचे प्रकार सुरू आहेत. केरळ, तामीळनाडू, आंध्रातील मंदिरांत प्रचंड संपत्ती व सोने आहे. त्यामुळे हिंदूंच्या सर्व देवांना गुन्हेगार ठरवून ‘निधर्मी’वादाच्या झांजा वाजवल्या जातील. कारण ‘नोटाबंदी’नंतर जी काळ्या पैशांविरुद्ध लढाई सुरू झाली त्याचा सगळ्यात जास्त फटका हिंदूंनाच बसत आहे. एम.आय.एम.चे अध्यक्ष मियां ओवेसी यांनी या नोटाबंदीचा तडाखा मुसलमानांनाच बसत असल्याचे सांगितले. कारण काय तर म्हणे मुसलमानांच्या मोहोल्ल्यात ‘एटीएम’च्या मशीन नाहीत. त्यामुळे हाल हाल सुरू आहेत, पण मियां ओवेसी यांना आम्ही सांगू इच्छितो की, त्यांचे मुसलमान भाईबंद हे जास्त सुखी आहेत. कारण हिंदू वसाहतीत ज्या एटीएम मशीन आहेत त्यातून
दिवसभर रांगा लावून
पैसे मिळत नाहीत व त्या रिकाम्या पेटार्‍यांवर अपेक्षाभंगाचे डोके फोडून घ्यायची वेळ लोकांवर आली आहे. दुसरे असे की, काळा पैसा हा फक्त मंदिरांतील पुरोहितांकडेच आहे असा शोध लावून मोदी सरकारने आपण पक्के निधर्मी असल्याचे जाहीर करून टाकले. हिंदुस्थानातील चर्चना मोठ्या प्रमाणात पैसा परदेशातून येतो व तो पैसा दलित, आदिवासी यांच्या धर्मांतरासाठी वापरला जातो. ही सर्व धर्मांतरे ‘ऑनलाइन’ म्हणजे ‘कॅशलेस’ स्वरूपात झाली असे आयकरवाल्यांना वाटते काय? अर्थात, जशा धाडी हिंदू पुरोहितांच्या घरादारांवर पडल्या, तशा धाडी ख्रिस्ती ‘पुरोहितां’च्या घरांवर टाकण्याचे धाडस कुणी दाखवले नाही. अर्थात आम्हाला कुणावर आरोप करायचे नाहीत, पण सहज मनात आले ते आम्ही बोलून दाखवले. मुसलमानांच्या बाबतीत तरी वेगळे काय बोलावे! विशिष्ट मशिदींमधून धर्मांध शक्तींना मोठा अर्थपुरवठा होतच आहे. महाराष्ट्रापासून देशाच्या कानाकोपर्‍यात जे मदरसे व मशिदी उभ्या राहिल्या त्यांची भव्यता थक्क करणारी आहे व इस्लामी राष्ट्रातून त्यासाठी परदेशी चलन सुसाट येत आहे. या परदेशातून येणार्‍या पैशांचा हिशेब मागण्यासाठी मदरसे, मशिदींवर आयकर विभागाचे शूर अधिकारी धाडी घालतील काय? पण तेवढी हिंमत या लोकांत नक्कीच नाही. शेवटी धाडी घालण्यासाठी सरकारला मंंदिरांचे पुरोहितच सापडले. काँग्रेस पक्षावर पांघरूण घालावे असा हा निधर्मीवाद आहे. काँग्रेस, मुलायमसिंह किंवा लालू यादवांचा निधर्मीवाद झक मारेल अशी कामगिरी पुरोहितांच्या जानव्यास हात घालून बजावण्यात आली. तेव्हा लोकहो, गर्व से कहो हम हिंदू हैं! मग अयोध्येत राम मंदिर झाले नाही तरी चालेल!