नाणारच्या धमक्या… प्रकल्प महाराष्ट्रातच ठेवा!

नाणार प्रकल्पासाठी समुद्राचे पाणी न घेता कोयनेच्या अवजलाचा वापर करता येईल काय याची चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्रात इतरत्रदेखील जलविद्युत प्रकल्प आहेत. जर कोयनेच्या अवजलाचा वापर रिफायनरीसाठी करण्याचा अभ्यास सुरू असेल तर या प्रकल्पांबाबतही तसा अभ्यास करायला काय हरकत आहे? तसे होणारच असेल तर गुजरातच्या धमक्या न देता हा प्रकल्प महाराष्ट्रातच इतरत्र नेता येईल. आम्ही म्हणतो विदर्भ अथवा मराठवाड्य़ात न्या. मुख्यमंत्र्यांचे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे स्वप्नही एका पावलाने पुढे जाईल. मुख्यमंत्री, हे एवढे कराच!

जो उठतोय तो महाराष्ट्रालाच अक्कल शिकवतोय. असे गेल्या काही वर्षांत घडतंय खरं. दुसरे म्हणजे जो उठतोय तो कोकणातील निसर्ग उद्ध्वस्त करायला निघाला आहे, हे नाणार प्रकल्पाने पुन्हा दाखवून दिले. नाणारसारखा रिफायनरीचा प्रकल्प लादून निसर्ग समृद्धीने नटलेल्या कोकणच्या भूमीची राखरांगोळी करू नका ही शिवसेनेची भूमिका असतानाही केंद्र सरकारने स्थानिक जनतेचा विरोध डावलून एका अरबी कंपनीबरोबर या प्रकल्पाचा सामंजस्य करार केला. स्थानिकांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही, असा शब्द देऊनही मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्री खोटे बोलले व त्यांनी कोकणच्या जनतेला मूर्ख बनवले आहे. आता खोटेपणाच्या बाबतीत मुख्यमंत्री आणखी दहा पावले पुढे गेले. मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केले आहे की, लोकांचा हा असाच विरोध होत राहिला तर नाणार रिफायनरी गुजरातला जाईल. मुख्यमंत्र्यांनी ही धमकी दिली आहे की त्यांनी कुणाची तरी चमचेगिरी केली आहे! मुख्यमंत्र्यांनी ‘नाणार’चा प्रकल्प वाचवायला हवा, पण त्यासाठी कोकणचे झरे, समुद्र, मासे, शेती, आंब्याच्या बागांचे बळी का देता? सर्व विषारी प्रकल्प एकजात कोकणच्याच समुद्रकिनाऱ्यांवर का आणले जात आहेत? निसर्ग, बागायती, मासेमारी, पर्यटनाबरोबर कोकणातील जनतेचे आरोग्यही धोक्यात येईल याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करू नये याचे आश्चर्य वाटते. आधी एन्रॉन, मग जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प व आता हा नाणारचा रिफायनरी प्रकल्प. याशिवाय

दुसरे औद्योगिक प्रकल्प
कोकणच्या भूमीवर का येत नाहीत? जहाज बांधणीच्या प्रकल्पांना समुद्रकिनारी चांगली उभारी घेता येईल. गोव्यात ज्याप्रमाणे फार्मास्युटीकल उद्योगांनी चांगले बस्तान बसवले आहे. त्याप्रमाणे अशाप्रकारच्या उद्योगांना कोकणातही हात-पाय पसरता येतील, पण कोकणच्या माथी मारले जात आहेत ते समुद्रकिनारे व हवा प्रदूषित करणारे विषारी प्रकल्प. शिवसेनेचा विकासाला विरोध कधीच नव्हता व नाही. प. बंगालात डाव्यांनी व पुढे ममतांनी उद्योगांना विरोध केला व ‘टाटां’चा नॅनोसारखा प्रकल्प सिंगूरमधून बाहेर पडला. शिवसेनेने असे विरोधासाठी विरोधाचे राजकारण कधी केले नाही. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगरसारख्या शहरात उद्योग टिकले व भरभराट झाली ती शिवसेनेच्या उदार धोरणामुळेच. कामगार क्षेत्रात प्रचंड दबदबा असूनही उद्योगपती व त्यांचे उद्योग बंद पडणार नाहीत याचीच काळजी आम्ही घेतली. उद्योग आला तर कामगारांना काम मिळेल. त्यांचा उत्कर्ष होईल, ही भूमिका आम्ही घेत राहिलो. त्यामुळे शिवसेना विकासाला विरोध करीत असल्याच्या ‘थापां’वर जनता विश्वास ठेवणार नाही. शेती, पर्यटन, बागायती, मासेमारी हा कोकणवासीयांचा परंपरागत व्यवसाय आहे. तो खतम करणारे विषारी प्रकल्प आमच्या छाताडावर ठोकू नका, एवढेच आमचे सध्या हात जोडून सांगणे आहे. विरोध होत राहिला तर नाणार रिफायनरी गुजरातला जाणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाणार प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्र्यांना

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन
वाटली काय? मुख्यमंत्र्यांनी संयमाने वागावे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत याचे भान ठेवून बोलावे. मागे गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल मुंबईत आल्या व येथील उद्योगपतींना ‘फूस’ लावण्याचा प्रयत्न केला. ‘‘मुंबईत काय ठेवले आहे? उद्योगपतींनो गुजरातला चला,’’ असे आनंदीबेन म्हणाल्या होत्या. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उसळून उठले असते तर बरे झाले असते. मुख्यमंत्र्यांना मुंबई व महाराष्ट्रातील उद्योगांची काळजी आहे असे वाटले असते. दुसरे असे की, नाणारसारखे प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याचे इशारे कसले देता? आमच्या विदर्भात न्या. तेथेही मोठे प्रकल्प येऊ द्या. अशा प्रकल्पांना समुद्राचे पाणी लागते. विदर्भात समुद्र नाही असे उत्तर त्यावर दिले जाईल; पण नाणार प्रकल्पासाठी समुद्राचे पाणी न घेता कोयनेच्या अवजलाचा वापर करता येईल काय याची चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्रात इतरत्रदेखील जलविद्युत प्रकल्प आहेत. रायगड, ठाणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्य़ांपासून नागपूर, मराठवाड्य़ापर्यंत ही केंद्रे सुरू आहेत. जर कोयनेच्या अवजलाचा वापर रिफायनरीसाठी करण्याचा अभ्यास सुरू असेल तर या प्रकल्पांबाबतही तसा विचार आणि अभ्यास करायला काय हरकत आहे? तसे होणारच असेल तर गुजरातच्या धमक्या न देता हा प्रकल्प महाराष्ट्रातच इतरत्र नेता येईल. आम्ही म्हणतो विदर्भ अथवा मराठवाड्य़ात न्या. तेथे एक लाख रोजगारांची निर्मिती होईल व भरभराटही होईल. मुख्यमंत्र्यांचे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे स्वप्नही एका पावलाने पुढे जाईल. मुख्यमंत्री, हे एवढे कराच!