चांदणी निखळली!

मृत्यूने चाल खेळली; पण श्रीदेवीहीचालबाजहोती. चित्रपट प्रदर्शनाच्या झगमगाटी कार्यक्रमात नायकनायिका उंची वस्त्र परिधान करून जातात तशीच ती गेली. मनाने खंबीर आणि स्वभावाने जिद्दी असलेली श्रीदेवी स्वर्गातही मुलीच्या चित्रपटाचा प्रीमियर शो पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देवांनो सांभाळा, पृथ्वीवरील चांदणी निखळली आहे. ती स्वर्गाच्या दिशेने निघाली आहे. स्वर्गातील अप्सरांचे आसन डळमळीत झाले आहे.

माणसाने मृत्यूला घाबरले पाहिजे, मृत्यू अटळ आहे आणि तेच अंतिम सत्य आहे वगैरे शिकवण लाख खरी असली तरी मृत्यूलाही कुणाचे तरी भय असायला हवे की नको? ‘आले मनात की उचल’ हा यमराजाचा खाक्या सदासर्वकाळ कसा काय मान्य करता येईल? श्रीदेवी नावाची एक जिती-जागती अप्सरा ज्या निष्ठुरपणे मृत्युदेवतेने ओढून नेली ते सत्य कसे स्वीकारता येईल? श्रीदेवीचा मृत्यू अकाली तर आहेच; पण त्याहीपेक्षा मनाला चटका लावणारा आहे. रविवारची पहाट ही वाईट बातमी घेऊनच उगवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक हिंदुस्थानी माणूस हळहळला. अलीकडे अनेकदा बॉलीवूडमधील सेलिब्रिटींच्या निधनाच्या अफवा वेगाने पसरत असतात. ही तशीच अफवा ठरावी असे प्रत्येकाला मनोमन वाटत होते. दुर्दैवाने ती अफवा ठरली नाही. आपल्या चाहत्यांना एक अनामिक चुटपूट, रुखरुख आणि हुरहूर लावून श्रीदेवी लांबच्या प्रवासाला निघून गेली. माणसाने सद्वर्तनी असावे म्हणून त्याला मृत्यूचा धाक दाखवणे ठीक, पण जी तारका आपले रूप आणि दिलखेचक अभिनयाने दोन-तीन पिढय़ांना रिझवण्याचे काम करीत होती तिला एकाएकी घेऊन जाण्याचा अधिकार मृत्यूला दिलाच कोणी? तोही तिच्या लाखो चाहत्यांना न विचारता! आपल्या आरस्पानी सौंदर्याने लाखो रसिकांच्या हृदयसिंहासनावर आसनस्थ असलेल्या

श्रीदेवी नावाच्या अभिनयसम्राज्ञीची

हृदयक्रियाच बंद पाडून एका क्षणात तिला या जगातून दुसऱ्या दुनियेत घेऊन जाणे हा घातच आहे. ५४ वर्षे हे काय जाण्याचे वय आहे? दुबईत भाच्याच्या लग्नसमारंभासाठी नटून-थटून तयार झालेली श्रीदेवी पती बोनी कपूर आणि लहान मुलीसोबत छान बागडत होती. उत्तम पोषाख परिधान करून समारंभात सगळय़ांशी हसून-खेळून बोलत होती. आनंदात न्हाऊन निघालेला असा सगळा माहौल असतानाच काही तासांनी श्रीदेवी बाथरूममध्ये पाय घसरून पडते काय आणि ‘हार्टफेल’ असे  कारण देऊन डॉक्टर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर करतात काय, सारेच अतर्क्य आणि अविश्वसनीय! चार वर्षांची अम्मा यंजर अय्यप्पन नावाची तामीळ कुमारिका बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवते आणि पुढे ‘श्रीदेवी’ बनून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते हा सगळाच प्रवास अद्भुत आहे. तेलुगू, तामीळ, मल्याळम, कन्नड चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या श्रीदेवीने ‘सोलहवाँ सावन’पासून बॉलीवूडमध्ये पाय ठेवले. ‘हिम्मतवाला’ चित्रपटातील जितेंद्रसोबतच्या ‘नैनो में सपना…’ या गाण्याने तिचे आयुष्यच बदलून टाकले. उत्कृष्ट अभिनय, कमालीचे नृत्यकौशल्य, पडद्यावरील सहज वावर, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा मंजूळ असा अनुनासिक आवाज, बोलके, खटय़ाळ डोळे आणि सुडौल शरीर ही श्रीदेवीची बलस्थाने होती. त्यांचा पुरेपूर वापर श्रीदेवीने प्रत्येक भूमिकेत समरसून केला. ‘मवाली, मकसद, मास्टरजी, मिस्टर इंडिया, चाँदनी, नगिना, निगाहें’ अशा लागोपाठ झळकलेल्या सुपरहिट चित्रपटांनी श्रीदेवीला ‘नंबर वन’ बनवले. तिच्या

कसदार अभिनयाने

गाजलेले ‘सदमा’ आणि ‘लम्हे’ हे चित्रपट तर रसिकांनी डोक्यावरच घेतले. ‘चालबाज’मधील डबल रोलने तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. लग्नानंतर संसारात रमलेल्या श्रीदेवीने मोठय़ा ब्रेकनंतर सहा वर्षांपूर्वी ‘इंग्लिश-विंग्लिश’ चित्रपटातून सिनेसृष्टीत दणक्यात पुनरागमन केले. या चित्रपटातील इंग्रजी न येणाऱ्या गृहिणीची जी अफलातून भूमिका श्रीदेवीने केली त्याला तोड नाही. शंभरहून अधिक चित्रपटांच्या माध्यमातून तिने रसिकांची मने जिंकली होती. त्यामुळेच श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा चाहत्यांच्याही हृदयाची धडधड क्षणभर थांबली. तिचे अचानक जाणे सर्वांनाच वेदना देऊन गेले. मोठी मुलगी जान्हवी आपल्याप्रमाणेच बॉलीवूडची तारका व्हावी असे स्वप्न श्रीदेवी बघत होती. जान्हवीचा ‘धडक’ हा पहिला चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्याच्याच चित्रीकरणासाठी जान्हवी कुटुंबासोबत दुबईतील लग्नसोहळय़ास गेली नव्हती. दुर्दैव असे की, मुलीचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काळाने श्रीदेवीला ओढून नेले. मात्र स्वर्गस्थ देवांनीही एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. श्रीदेवी ही अस्सल कलावंत होती. ती अभिनयसम्राज्ञी होती. मृत्यूने चाल खेळली; पण श्रीदेवीही ‘चालबाज’ होती. चित्रपट प्रदर्शनाच्या झगमगाटी कार्यक्रमात नायक -नायिका उंची वस्त्रs परिधान करून जातात तशीच ती गेली. मनाने खंबीर आणि स्वभावाने जिद्दी असलेली श्रीदेवी स्वर्गातही मुलीच्या चित्रपटाचा प्रीमियर शो पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देवांनो सांभाळा, पृथ्वीवरील चांदणी निखळली आहे. ती स्वर्गाच्या दिशेने निघाली आहे. स्वर्गातील अप्सरांचे आसन डळमळीत झाले आहे!