ठसा : शरद जोशी

>>विकास काटदरे

डोंबिवलीचे ग्रंथ प्रसारक व विविध भूमिकेत काम करणारे शरद जोशी याचे नुकतेच निधन झाले. अस्वस्थ मित्र मंडळ, नागरिक संघ, ग्राहक पंचायत, ‘ब्रिज’ मासिक संपादक, ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध भूमिकेत ते वावरत होते. आता संगणक व खासगी उपग्रह वाहिन्यांच्या आक्रमणामुळे वाचनसंस्कृती धोक्यात आल्याची ओरड केली जाते. सध्या तर ग्रंथ विक्रेते वाचकांपर्यंत थेट जाण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असून त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. मात्र ५० वर्षांपूर्वीपासून डोंबिवलीत ‘अवलिया’ म्हणून नावारूपाला आलेले शरद जोशी थेट लोकांपर्यत दर्जेदार पुस्तक पोहचावे म्हणून पुस्तकांचा प्रसार व प्रचार करत होते. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी देह ठेवला तोपर्यंत त्यांचे ग्रंथप्रसाराचे काम सुरूच होते. जीवन विमा कार्यालयात ते कामाला होते.

‘ब्रिज’ मासिकाचे ते संपादक होते. ‘वाचाल तर वाचाल’ ही भूमिका घेऊन त्यानी अर्धशतक पुस्तक प्रसाराचे काम केले तेही स्वतःच्या खिशाला चाट लावून. स्वतः ग्रंथ विक्रेते वा प्रकाशक नसताना पुस्तकांच्या प्रेमापोटी उत्तमोत्तम आणि अत्यंत दर्जेदार पुस्तके जास्तीत जास्त वाचकांनी वाचावी यासाठी त्याची धडपड केली. पोस्टकार्डावर ते पत्र लिहून पुस्तक वाचनाचा आग्रह करत व थोडक्यात त्याविषयी माहिती देत असत. पत्रव्यवहारातून ग्रंथ प्रसार व प्रचार हे त्याचे खास वैशिष्ट्य. आपल्या खिशाला खार लावून सुमारे ५० हजार पत्रे लिहिली आहेत. विविध साहित्यप्रेमी, व्यक्ती, वाचक, पत्रकार, प्रकाशक ग्रंथ विक्रेते यांनाही पत्र पाठवून ते कळवत असत. मराठी पुस्तकाचा प्रसार व प्रचार त्यानी केवळ डोंबिवलीत नाही तर महाराष्ट्राबाहेरही अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता आदी भागांत ते मराठी वाचकांना कळवत असत. कोणत्याही शुभप्रसंगी पुस्तक भेट द्यावी असा त्याचा आग्रह असे. असा एक अवलिया आपल्यातून गेला आहे.