प्रदूषणाची ‘राजधानी’

दिल्ली क्राइम कॅपिटल म्हणून कुख्यात होतीच. आता पोल्यूशन कॅपिटल म्हणजे प्रदूषणाची ‘राजधानी’ असा आणखी एक डाग दिल्लीच्या माथी लागला. पुन्हा हा डाग ज्यांच्यामुळे लागला ते सगळेच मोकळा श्वास घेत आहेत. सामान्य दिल्लीकरांचा श्वास मात्र गुदमरला आहे. तो मोकळा करण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षांनी दिले, पण तात्पुरत्या मलमपट्टीशिवाय काहीच झाले नाही. मुंबईचे पर्यावरण आणि आरोग्य याबाबतीत मुंबई महापालिकेकडे बोटे दाखविणाऱ्यांनी खराब हवेबाबत दिल्लीचे ‘बीजिंग’ का झाले याचे उत्तर द्यायला हवे.

देशाची राजधानी दिल्लीवर वायुप्रदूषणामुळे ‘बंद’ पाळण्याची वेळ सरकार आणि जनतेवर पुन्हा आली आहे. दिल्ली आणि प्रदूषण या गेल्या काही वर्षांत एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत सर्वोच्च न्यायालयाने वायुप्रदूषणाच्या धोक्याचा विचार करून दिल्लीवर ‘फटाकेबंदी’चा हातोडा मारला होता. आता तर दिल्ली सरकारला ‘बंदी’चा आदेश जारी करण्याची वेळ आली आहे. सर्व प्राथमिक शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर केली गेली. अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली. लोकांच्या मॉर्निंग वॉकवर आणि पायी फिरण्यावर निर्बंध आले. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेवरही अनिश्चिततेचे ‘दाट धुके’ पसरले आहे. शिवाय श्वासोच्छ्वास, फुप्फुस आणि हृदयाच्या आजारांचा धोका वाढला आहे. कारण राजधानीच्या हवेतील ऑक्सिजन कमी होऊन नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. अर्थात दिल्लीचे असे गॅस चेंबर होणे ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. दरवर्षीच हिवाळ्याची सुरुवात दिल्लीमध्ये विषारी धुरक्याने होते. धूर आणि धुक्याची जाड चादर तेथील वातावरणात पांघरली जाते. गेल्या वर्षीही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्ली आणि दिल्लीकर असेच विषारी धुक्याने काळवंडले होते. शाळांपासून उद्योग-व्यवसाय चार-पाच दिवस ठप्प ठेवावा लागला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे आणि

दिल्लीकरांचा श्वास कोंडला
हे. मुळात दिल्ली ही देशाची राजधानी असली तरी ‘१२ महिने २४ तास’ प्रदूषणाच्या विळख्यातच असते. देशातील सर्वाधिक वायुप्रदूषित शहरांत दिल्लीचा समावेश आहे. हवेचा शुद्धता निर्देशांक १०० असायला हवा, मात्र राजधानीतील हवेने सध्या ३०० पर्यंत उसळी मारली आहे. हवेचा दर्जा पीएम २.५ ते पीएम २५ असण्याऐवजी पीएम २.५ ते पीएम १५० एवढा वाढला आहे. ज्या दिल्लीने आजपर्यंत अनेक ‘हल्ले’ पाहिले आणि पचविले त्या दिल्लीला विषारी वायूचा ‘हल्ला’ पचविणे अशक्य झाले आहे. राजकीय प्रदूषण सहन करणारा दिल्लीकर वायुप्रदूषण सहन करता करता घुसमटला आहे. कधी डेंग्यू तर कधी चिकुनगुनियाचा विळखा येथे ६०० पेक्षा अधिक बळी घेतो. प्रदूषणाचा विळखा तर दिल्लीकरांसाठी ‘स्लो पॉयझन’ आणि ‘सायलेंट किलर’च ठरला आहे. एका अंदाजानुसार गेल्या वर्षी दिल्लीत प्रदूषणाने ५० हजारांवर लोकांचा जीव घेतला आहे. येथे दर तीन मुलांमागे एकाला श्वसनाचे आजार आहेत. यंदा परिस्थिती एवढी भयंकर आहे की, आरोग्य आणीबाणी जाहीर करा अशी विनंतीच दिल्ली सरकारला करण्याची वेळ वैद्यकीय संघटनांवर आली आहे. हे सगळेच भयंकर आहे.

राजकीय प्रदूषणामुळे
दिल्लीचे पर्यावरण असेही बिघडलेले असतेच, पण त्यापेक्षा प्रचंड वाढलेले वायुप्रदूषण भीषण आहे. पुन्हा त्याचे खापर कोणी कोणावर फोडायचे हादेखील प्रश्न आहेच. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून दिल्ली आधीच ‘अनेक पायांची शर्यत’ झाली आहे. नायब राज्यपाल, मुख्यमंत्री, तीन महापालिकांचे महापौर, त्यांचे अधिकारी अशा वेगवेगळ्या यंत्रणांच्या तावडीत दिल्ली सापडली आहे. त्यात बेकायदेशीर वस्त्या, कारखाने, प्रदूषण निर्माण करणारी धुरांडी, मोटारींची अमर्याद संख्या, गटारी-नाल्यांची अस्वच्छता आणि सर्वच यंत्रणांचा बकाल कारभार यांची भर पडली आहे. दिल्ली सेक्स कॅपिटल, क्राइम कॅपिटल म्हणून कुख्यात होतीच. आता पोल्यूशन कॅपिटल म्हणजे प्रदूषणाची ‘राजधानी’ असा आणखी एक डाग दिल्लीच्या माथी लागला. पुन्हा हा डाग ज्यांच्यामुळे लागला ते सगळेच मोकळा श्वास घेत आहेत. सामान्य दिल्लीकरांचा श्वास मात्र गुदमरला आहे. तो मोकळा करण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षांनी दिले, पण तात्पुरत्या मलमपट्टीशिवाय काहीच झाले नाही. मुंबईचे पर्यावरण आणि आरोग्य याबाबतीत मुंबई महापालिकेकडे बोटे दाखविणाऱ्यांनी खराब हवेबाबत दिल्लीचे ‘बीजिंग’ का झाले याचे उत्तर द्यायला हवे.