सेवाभावी शंकराचार्य!

शंकराचार्यांनी केवळ मंदिरातच जावे, मंदिरातच राहावे, सोवळे-ओवळे पाळणाऱ्या ब्राह्मण कुटुंबांकडेच जावे हा प्रघात जयेंद्र सरस्वती यांनी बंद केला. मला दलितांच्या घरी, त्यांच्या वस्तीत घेऊन चला, असा त्यांचा आग्रह असे. त्यांनी दलितांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधल्याची अनेक उदाहरणे देता येतील. जयेंद्र सरस्वती हे कर्मकांडापेक्षा सेवेला महत्त्व देणारे सेवाभावी शंकराचार्य म्हणून स्मरणात राहतील. कांची कामकोटी पीठाच्या नव्या शंकराचार्यांनीही हाच कित्ता गिरवायला हवा!

हिंदू धर्मीयांचे सर्वोच्च गुरू गेले. कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्रद्धेय जयेंद्र सरस्वती यांचे देहावसान झाले. एका विद्वान आणि संन्यस्त जीवनाचा अंत झाला. कर्मठतेमध्ये अडकलेले मठ आणि पराकोटीच्या सनातनी आचरणामुळे हिंदू धर्माचे जे अपरिमित नुकसान झाले ते ओळखून मठ आणि धर्माला कर्मठतेच्या पलीकडे नेण्याचे महत्कार्य शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी केले. धर्माच्या उत्थानासाठी जातीपलीकडचा विचार जोपासून कांची कामकोटी मठाच्या माध्यमातून शंकराचार्यांनी कर्मकांडापेक्षा सेवाकार्याला अधिक महत्त्व दिले. स्वामी जयेंद्र सरस्वती यांचे हे वेगळेपण आजवरच्या तमाम शंकराचार्यांच्या तुलनेत म्हणूनच अधिक उठून दिसते. एकीकडे धर्मकार्य आणि दुसऱया बाजूला सेवाकार्य असा समतोल त्यांनी साधला होता. त्यामुळेच हिंदू धर्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी आयुष्य झिजवणाऱ्या शंकराचार्यांचे जाणे ही हिंदू धर्मासाठी मोठीच हानी म्हणायला हवी. स्वामीजींच्या निधनाचे दुःखद वर्तमान बुधवारी सकाळी जाहीर झाले आणि देशभरातील हिंदू धर्मीयांना, खासकरून अध्यात्मात रुची घेणाऱया धर्मपरायण जनतेला जणू आपल्याच कुटुंबातील एखादी वडीलधारी व्यक्ती गमावल्याचे दुःख झाले. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती हे नाव उच्चारल्याबरोबर डोळय़ासमोर येते ती भगवे वस्र परिधान केलेली शांतचित्त आणि सदैव हसतमुख मूर्ती. कपाळावर पांढरेशुभ्र भस्म, सोबत दंडक म्हणून असलेली काठी, आसनही भगवेच, वयोपरत्वे चेहऱ्यावर वाढलेले पांढऱ्या दाढीचे खुंट, उतरत्या वयातही

विद्वत्ता आणि तपस्येचे

विलसत असलेले तेज आणि खास दाक्षिणात्य आवाजातील त्यांची अमोघ वाणी… हे सारेच आता हरवले आहे. खरा संत किंवा सच्चा गुरू कधीही स्वतःला ईश्वर म्हणून किंवा ईश्वरी अंश म्हणून जाहीर करत नाही. ईश्वरभक्तीच्या माध्यमातून सामान्य जनतेला सन्मार्गावर, परमार्थाच्या वाटेवर नेण्याचे अलौकिक कार्य संतांनी करायचे असते. पुराणकाळातील असंख्य संतांचे याविषयी दाखले देता येतील. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनीही नेमके हेच कार्य केले. त्यांचे संपूर्ण जीवन एखाद्या फकिरासारखेच राहिले. आदी शंकराचार्यांनी जसे आपले जेमतेम ३२ वर्षांचे आयुष्य राष्ट्र आणि धर्माच्या उत्थानासाठीच खर्च केले, त्याचप्रमाणे जयेंद्र सरस्वती यांनीही आपले समग्र जीवन धर्मकार्याबरोबरच समाजकार्य उभे करून देशभरातील संत-महंतांसमोर आदर्श निर्माण केला. केवळ मंदिरे, वेदशाळा, संस्कृत अध्यापन आणि मठांचीच उभारणी न करता त्यासोबतच शैक्षणिक संस्था, ७० हून अधिक शाळा, लहान-मोठी अनेक रुग्णालये, अनाथालये, वृद्धाश्रम, अपंगालय, अन्नछत्र असे थोडेथोडके नव्हे, ४०० हून अधिक संस्थांच्या माध्यमातून शंकराचार्य जयेंद्र सरस्वती कार्य करीत राहिले. आयुष्यभर केवळ एकच भगवे वस्र परिधान करून आणि एकच वेळ अन्नग्रहण करून कांची कामकोटी पीठाकडे श्रद्धेने येणारा पैसा त्यांनी केवळ लोककल्याणासाठीच सेवाकार्यावर खर्च केला. मठाच्या तिजोरीत जे काही धन आले ते सारे

समाजासाठी आणि दीनदुबळय़ांसाठी
खर्च केले. एवढे करूनही मठातील कथित गैरव्यवहाराचा आरोप आणि मठाच्या एका मॅनेजरचा खून केल्याचा ठपका ठेवून तामीळनाडूच्या तत्कालीन जयललिता सरकारने हिंदू धर्माच्या या सर्वोच्च गुरूला तुरुंगात डांबले. अर्थात, कुठलाही पुरावा नसताना शंकराचार्यांना ऐन दिवाळीत अटक होऊनही देशातील ८० कोटी हिंदूंच्या भावना मात्र नेहमीप्रमाणे भडकल्या नाहीत. अतिरेक्यांच्या अटकेनंतरही रस्त्यावर उतरून मोर्चे काढणारे ते धर्मांध कुठे आणि सर्वोच्च धर्मगुरूला अटक होऊनही निपचित पडलेले हिंदू धर्मीय कुठे! पुढे शंकराचार्यांची या खुनातून निर्दोष सुटका झाली. जयेंद्र सरस्वती या अग्निदिव्यातून बाहेर आले खरे; पण हिंदू धर्माला अपमानित करण्याचे राज्यकर्त्यांचे पातक मात्र यशस्वी झाले. शंकराचार्यांनी केवळ मंदिरातच जावे, मंदिरातच राहावे, सोवळे-ओवळे पाळणाऱ्या ब्राह्मण कुटुंबांकडेच जावे, हा प्रघातही जयेंद्र सरस्वती यांनी बंद केला. मला दलितांच्या घरी, त्यांच्या वस्तीत घेऊन चला, असा त्यांचा आग्रह असे. त्यांनी दलितांच्या घरी जाऊन, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधल्याची अनेक उदाहरणे देता येतील. जयेंद्र सरस्वती हे कर्मकांडापेक्षा सेवेला महत्त्व देणारे सेवाभावी शंकराचार्य म्हणून स्मरणात राहतील. कांची कामकोटी पीठाच्या नव्या शंकराचार्यांनीही हाच कित्ता गिरवायला हवा!