लास वेगासचे क्रौर्य!

लास वेगासचे हे क्रूर हत्याकांड ‘इसिस’ने घडवले की नाही हे आज ना उद्या स्पष्ट होईलच, मात्र अमेरिकेतील बंदुका बाळगण्याची मोकळीक दिवसेंदिवस घातक सिद्ध होत आहे. या खुल्या शस्त्रसंस्कृतीला निर्बंध घालणारे धोरण विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आखावेच लागेल. लास वेगासच्या क्रौर्याचा हाच धडा आहे!

जागतिक महासत्ता हे बिरुद अभिमानाने मिरविणारा अमेरिकेसारखा बलाढ्य देश पुन्हा घायाळ झाला आहे, रक्तबंबाळ झाला आहे. छंदी-फंदी आणि आलिशान जीवनशैलीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या लास वेगास शहरात एका बंदूकधाऱ्याने जो खुनी खेळ मांडला त्यामुळे केवळ अमेरिकाच नव्हे तर सारे जग सुन्न झाले आहे. एक ६४ वर्षांचा वृद्ध इमारतीच्या ३२ व्या मजल्यावरून जवळच सुरू असलेल्या संगीतरजनीच्या कार्यक्रमावर अंदाधुंद गोळीबार करतो, किडे-मुंग्या माराव्यात इतक्या सहजपणे माणसे मारत सुटतो आणि या क्रूर हत्याकांडात सुमारे ६० लोक मृत्युमुखी पडतात, ५०० हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. हा साराच घटनाक्रम थरकाप उडविणारा आहे. एक म्हातारा नियोजनबद्धपणे कट रचून इतक्या थंड डोक्याने मृत्यूचे असे तांडव घडवू शकतो हेच मुळात अगम्य आणि काहीसे बुचकाळ्यात टाकणारे आहे. मात्र स्टिफन पॅडॉक नावाच्या एकमेव हल्लेखोराने अमेरिकेसारख्या महासत्तेला चकित करून हा भीषण नरसंहार घडवला. १६ वर्षांपूर्वी झालेल्या ‘९/११’ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. अमेरिकन वेळेनुसार रविवारी रात्री १० वाजता हा खुनी हल्ला झाला तेव्हा एक पॉपस्टार गाणे सादर करीत होता. कार्यक्रमासाठी जमलेले २० ते २५ हजार लोक पॉपच्या ठेक्यावर बेधुंद होऊन आनंद घेत होते. त्याचवेळी बेछूट गोळीबार सुरू झाला. संगीतरजनीस जमलेल्या लोकांना आधी ही फटाक्यांची आतषबाजी वाटली, मात्र

गोळ्यांच्या वर्षावाने

शरीराची चाळण होऊन एकापाठोपाठ लोक कोसळू लागले तेव्हा लोक सैरावैरा पळत सुटले. चारही बाजूला रक्ताचे पाट वाहत होते. मात्र तरीही ३२ व्या मजल्यावरील खिडकीतून स्टिफन पॅडॉक स्वयंचलित बंदुकीचे ट्रिगर पुनः पुन्हा दाबत होता. बंदुकीतून एकाचवेळी निघणाऱ्या शेकडो गोळ्या निरपराध लोकांना छिन्नविच्छिन्न करत होत्या. हल्ला नेमका कुठून होतोय हे कळेपर्यंत ५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. जखमींच्या किंकाळ्या आणि आक्रोशाने आसमंत विदीर्ण झाला आणि एवढे नृशंस हत्याकांड घडविल्यानंतर पोलिसांनी पकडण्यापूर्वीच या राक्षसी हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. हॉटेलच्या ज्या रूममधून स्टिफन पॅडॉकने हा अमानुष नरसंहार घडवला त्या रूममध्ये तब्बल १० अत्याधुनिक स्वयंचलित बंदुका पोलिसांच्या हाती लागल्या. एवढय़ा बंदुका घेऊन हल्लेखोर हॉटेलात पोहोचलाच कसा? एवढय़ा शस्त्रास्त्रांनी भरलेल्या सुटकेसेस हॉटेलात जात असताना सुरक्षा यंत्रणा काय करीत होती, हा प्रश्नच आहे. लास वेगासमधील हे हत्याकांड ‘दहशतवादी हल्ला’ आहे हे मानायला अमेरिका अद्याप तयार नाही. हल्ल्यानंतर काही तासांतच इसिस या कुख्यात अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. इसिसच्या अधिकृत वृत्तसंस्थेने तशी घोषणा करूनही महासत्ता अजूनही ते स्वीकारायला कचरते आहे. हल्लेखोर पॅडॉक आमचाच कमांडो होता. काही महिन्यांपूर्वी त्याने ख्रिश्चन धर्माचा त्याग करून इस्लाम धर्म स्वीकारला होता. अमेरिका व मित्रदेशांच्या आघाडीने

इराक आणि सीरियावर जे हल्ले

चालवले आहेत त्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला घडविल्याचा दावा इसिसने केला आहे. मुळात हल्लेखोर पॅडॉक हा रिअल इस्टेट आणि जुगारातला मोठा गॅम्बलर आहे. स्वतःच्या मालकीची दोन विमाने आणि अमेरिकेच्या कानाकोपऱ्यात प्रचंड प्रॉपर्टी असताना ‘धर्मवेडा’च्या जिहादी शिकवणीशिवाय दुसरे काही कारण या हत्याकांडामागे असेल असे संभवत नाही. तसे पाहता मानसिक संतुलन गमावल्यामुळे गोळीबार करण्याच्या घटना अमेरिकेत सातत्याने घडत असतात. दरवर्षी अशा घटनांमध्ये १२ हजार लोक मृत्युमुखी पडतात. मागील ५० वर्षांत माथेफिरूंनी केलेल्या गोळीबारात १५ लाख अमेरिकन नागरिक मारले गेले. दोन वर्षांपूर्वी एका महाविद्यालयात नऊ विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना अमेरिकन संसदेतच रडू कोसळले होते. अमेरिकेत सुमारे ९० टक्के लोकांकडे बंदुका आहेत. वाढती हत्याकांडे रोखण्यासाठी ही शस्त्रसंस्कृती नष्ट करावी अशी ओबामा यांची इच्छा होती, मात्र अमेरिकन काँग्रेसच्या बहुसंख्य सदस्यांचा शस्त्रांना पाठिंबा असल्यामुळे ओबामा यांना शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यावरून माघार घ्यावी लागली होती. त्याचीच मोठी किंमत आज अमेरिकेला मोजावी लागली. लास वेगासचे हे क्रूर हत्याकांड इसिसने घडवले की नाही हे आज ना उद्या स्पष्ट होईलच, मात्र अमेरिकेतील बंदुका बाळगण्याची मोकळीक दिवसेंदिवस घातक सिद्ध होत आहे. या खुल्या शस्त्रसंस्कृतीला निर्बंध घालणारे धोरण विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आखावेच लागेल. लास वेगासच्या क्रौर्याचा हाच धडा आहे!