आजचा अग्रलेख : ‘जेएनयू’त वीर सावरकर

6

‘जेएनयू’मध्ये वीर सावरकरांचे धडे देऊन या देशद्रोह्यांना चपराक मारणे हा जालीम उपाय आहे. या विद्यापीठात सावरकर अध्यासन केंद्र निर्माण केले जात आहे. सावरकरांचे हिंदुत्व, राजकीय, सामाजिक भूमिका, धर्मातला विज्ञानवाद, पाकिस्तानसंदर्भातील भूमिका अशा अनेक विषयांवर त्यामुळे तेथे विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना अभ्यास करता येईल. सावरकर हा नेहमीच अभ्यासाचा विषय राहिला आहे. वीर सावरकरांचा शिरकाव जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाला. आता तेथील देशद्रोह्यांचे अड्डे नष्ट होतील. वीर सावरकरांना आमची मानवंदना!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे धडे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दिले जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा आणि प्रखर राष्ट्रवादी असा निर्णय आहे. देश सावरकरांच्या मार्गाने गेला असता तर जगात तो हिंदू महासत्ता म्हणून उदयास आला असता व पाकिस्तानसारख्या राष्ट्रांचा जन्मच झाला नसता. सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. अंदमानच्या भयानक कारागृहात बाबा आणि तात्या या सावरकर बंधूंना दहा वर्षे यातना सहन कराव्या लागल्या. काँग्रेसचे मणिशंकर अय्यर छाप पुढारी व राहुल गांधींसारखे बेताल नेते सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचा अपमान करतात तेव्हा तो स्वातंत्र्यासाठी प्राणत्याग करणाऱया समस्त क्रांतिवीरांचा अपमान ठरतो. राहुल गांधी यांना वीर सावरकरांवर बोलण्याचा हक्क नाही. ‘लायकी’ हा शब्द आम्ही वापरणार नाही. राहुल गांधी म्हणतात, सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी नव्हते तर ब्रिटिशांची माफी मागून सुटलेले भगोडे होते. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास माहीत नसलेले राहुल गांधी व त्यांचे चवचाल सहकारी या सर्वांना अंदमानच्या त्याच काळकोठडीत फक्त पाच दिवस डांबून ठेवा. केवळ पाच मिनिटे कोलूला जुंपा व तेलघाणा ओढायला लावा. जिथे सावरकरांना दहा वर्षे कोंडले तेथे फक्त 10 तास एकांतात डांबा. म्हणजे मग राहुल गांधींना क्रांतीचा खरा अर्थ कळेल. खरे म्हणजे

सावरकरांच्या विचारांचे धडे

फक्त ‘जेएनयू’तच नव्हे तर देशातील प्रत्येक विद्यापीठातच द्यायला हवेत. हेच ते ‘जेएनयू’ जेथे कन्हैयाकुमारच्या नेतृत्वाखाली मूठभर लाल माकडांनी हिंदुस्थानचे तुकडे पाडण्यासंदर्भात गर्जना केल्या, संसदेवर हल्ला करणाऱया अफझल गुरूला आदरांजली वाहिली. अशा देशद्रोह्यांना साथ देणारे काँग्रेसचे नेते वीर सावरकरांना ‘माफीबाज’ म्हणतात तेव्हा यांच्या पुढच्या शंभर पिढय़ा नरकात खितपत पडल्याशिवाय राहणार नाहीत. ‘जेएनयू’मध्ये वीर सावरकरांचे धडे देऊन या देशद्रोह्यांना चपराक मारणे हा जालीम उपाय आहे. या विद्यापीठात सावरकर अध्यासन केंद्र निर्माण केले जात आहे. सावरकरांचे हिंदुत्व, राजकीय, सामाजिक भूमिका, धर्मातला विज्ञानवाद, पाकिस्तानसंदर्भातील भूमिका अशा अनेक विषयांवर त्यामुळे तेथे विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना अभ्यास करता येईल. सावरकर हा नेहमीच अभ्यासाचा विषय राहिला आहे. इतक्या यातना आणि छळ सहन करून हा माणूस जिवंत कसा राहिला, हाच अभ्यासाचा विषय आहे. राहुलच्या चेहऱयावर एक लेझर प्रकाशाचा ठिपका पाहताच काँग्रेसवाले टरकले. राहुलच्या जिवास खतरा असून त्यांची सुरक्षा वाढवावी अशी छाती पिटू लागले. प्रकाशकिरणाच्या एका ठिपक्यास घाबरणाऱया राहुल गांधी यांनी ‘जेएनयू’त जाऊन आता अभ्यास केला पाहिजे की, ‘दहा वर्षे विनायक दामोदर सावरकर या मृत्युंजयाने अंधारकोठडीत कशी काढली?’ सावरकरांनी मदनलाल धिंग्रा, चापेकर बंधूंसारखे क्रांतिकारक निर्माण केले व

देशासाठी बलिदान देणारी
नवतरुणांची पिढी उभी केली. राहुल गांधी यांनी काय केले? रॉबर्ट वढेरांच्या खांद्यावर हात टाकून ते फिरत आहेत. सावरकरांनी गर्जना करून सांगितले आहे, ‘राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदू जातीचे सैनिकीकरण करा.’ काँग्रेसी नेते मात्र असे सांगतात की, कश्मिरी अखंडतेच्या आड येणारे 370 कलम रद्द करू नका. हिंदुस्थानी सशस्त्र्ा क्रांतीचे नेते सावरकर यांना ब्रिटिश सरकारच्या न्यायाधीशाने 24 डिसेंबर 1910 रोजी दोन जन्मठेपेची 50 वर्षांच्या काळय़ा पाण्याची शिक्षा दिली. त्यानुसार त्यांच्या सुटकेचा दिवस होता 24 डिसेंबर 1960. ही तारीख बघून अंदमान कारागृहाचा जेलर म्हणाला होता, ‘यापूर्वीच दयाळू मृत्यू तुमची सुटका करील.’ त्यावर सावरकर ताडकन म्हणाले होते, ‘पन्नास वर्षे तुमचे राज्य तरी टिकेल का?’ मृत्युंजयाचा हाच प्रश्न खरा ठरला. 1960 पर्यंत ब्रिटनचे राज्य येथे राहणार नाही हे सावरकरांचे उद्गार खरे ठरले. सावरकरांचा उल्लेख काहीजण ‘मृत्युंजय’ असा करीत. त्यावर सावरकर म्हणत, ‘काव्यार्थाने हे म्हणणे ठीक आहे. मी पाच वेळा फाशीचे खांब हलवले. मृत्यूवर मात केली हे खरे, पण मी मानव असल्यामुळे ‘मृत्युंजय’ होऊ शकणार नाही. ‘संन्यस्त खड्ग’ नाटकात त्यांनी लिहिले आहे, ‘माणसे अमर झाली तर निवास, भोजनाचे प्रश्न भेडसावतील. एवढेच नव्हे तर त्यांना पुरेशी नावेही उपलब्ध होणार नाहीत.’ सावरकर हे असे परखड होते. वीर सावरकरांचा शिरकाव जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाला. आता तेथील देशद्रोह्यांचे अड्डे नष्ट होतील. वीर सावरकरांना आमची मानवंदना!